Soybean Market Update : लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातसोयाबीनच्या दरात अचानक मोठी उसळी पाहायला मिळत आहे. (Soybean Market Update)
मंगळवारी सोयाबीनला किमान ६,७०० रुपये तर कमाल ६,७९७ रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. (Soybean Market Update)
मागील काही दिवसांपासून दरात सातत्याने वाढ होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानासोबतच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Soybean Market Update)
दरात पंधरा दिवसांत जवळपास १,००० रुपयांची वाढ
मागील १५ दिवसांत सोयाबीनच्या दरात सुमारे १,००० रुपयांची वाढ झाल्याचे बाजार समितीच्या आकडेवारीवरून दिसून येते. २० एप्रिल रोजी सोयाबीनचे दर ५,३०० ते ५,७५१ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान होते. त्यावेळी आवकही १४,३०१ क्विंटल इतकी मोठी होती.
मात्र त्यानंतर बाजारातील स्थिती बदलली आणि ५ मे पर्यंत आवक घटून सुमारे ७,००० क्विंटलपर्यंत आली. दर वाढत जाऊन मंगळवारी ६,७९७ रुपयांपर्यंत पोहोचले.
आवक घटली, दर वाढले
सध्या लातूर बाजार समितीच्या मार्केट यार्डात दररोज ७ ते ८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. लातूरसह शेजारच्या जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत.
मात्र हंगामात जेव्हा दर कमी होते, तेव्हा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली होती. आता दर वाढल्यानंतर बाजारात माल कमी असल्याचे चित्र दिसत आहे.
शेतकऱ्यांचा हिरमोड, साठवणूकदारांचा फायदा?
मागील हंगामात सोयाबीनचे दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला होता.
अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीपर्यंत दर वाढतील या अपेक्षेने माल साठवून ठेवला होता, मात्र दर स्थिरच राहिल्याने त्यांचा हिरमोड झाला.
आता मात्र बाजारात दर वाढल्यानंतर बहुतेक शेतकऱ्यांचा माल संपलेला आहे. त्यामुळे या वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा साठवणूकदार आणि व्यापाऱ्यांना होत असल्याची चर्चा जोर धरत आहे.
शेती अर्थव्यवस्थेवर परिणाम
खाद्यतेलाच्या दरांमध्ये झालेली वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि मागणीतील बदल यांचा परिणाम सोयाबीन बाजारावर दिसून येत आहे.
आखाती देशांतील तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याचा परिणामही जाणवत आहे.
शेतकऱ्यांमध्ये प्रश्नचिन्ह
'दर वाढले, पण माल आमच्याकडे नाही' अशी स्थिती अनेक शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे ही दरवाढ नेमकी कोणाच्या फायद्याची ठरते आहे, हा प्रश्न आता शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
सध्या लातूर बाजारातील स्थिती पाहता, सोयाबीन दरात अजूनही चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीनने घेतली झेप; ६ हजार पार दर, अजून वाढणार का?
अधिक वाचा : soybean cotton rate : सोयाबीन-कापसाला जबरदस्त उठाव; दर पुन्हा वधारले
