Chia Market : पारंपरिक पिकांमध्ये सातत्याने होणाऱ्या तोट्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी चिया हे पीक आता नवा दिलासा देताना दिसत आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (२१ मे) रोजी चियाची तब्बल ८५० क्विंटल आवक (Arrivals) झाली. (Chia Market)
यावेळी प्रतिक्विंटल ११ हजार ७५० ते १४ हजार ३०० रुपये दर मिळाल्याने चियाच्या बाजारभावात केवळ दोन आठवड्यांत ५०० रुपयांची वाढ झाली आहे. ५ मे रोजी चियाचा दर ११ हजार २०० ते १३ हजार ८१० रुपये होता. त्या तुलनेत, २१ मे रोजी मोठी उसळी नोंदविण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिया पीक घेण्याचा कल वाढू लागला आहे. (Chia Market)
कमी खर्च: जास्त उत्पादन, अधिक नफा!
* चिया हे पीक अल्प पाणी आणि रासायनिक खतांचा मर्यादित वापर करूनही भरघोस उत्पादन देत असल्याने, पर्यावरणपूरक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
* तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे यांनी सांगितले की, चियाचे उत्पादन कमी खर्चात आणि कमी पाण्यात शक्य आहे. त्याला सध्या जो दर मिळतो आहे, तो पाहता इतर शेतकरी देखील हे पीक घेण्याचा विचार करतील.
* चिया हे अल्प खर्चिक, जास्त फायद्याचे आणि निर्यातक्षम पीक ठरत असल्याने, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा नवा पर्याय भविष्यातील शेतीला नवी दिशा देऊ शकेल.
इतर पिकांपेक्षा चियाचा दर दुपटीने जास्त
* वाशिममधील बाजार भावानुसार, सध्या सोयाबीनला क्विंटलमागे ४ हजार ६० ते ४ हजार २९०, चना (हरभरा) ला ५ हजार ०३० ते ५ हजार ५५५, मूग ६ हजार ७१० ते ७ हजार ४८५ आणि उडीदाला ५ हजार ७६० ते ६ हजार ७०१ रुपये दर मिळत आहे. त्यामानाने चियाचे दर ११ हजार ते १४ हजारांवर पोहोचले आहेत.
* या तुलनेत पाहता, चिया हे पीक आर्थिकदृष्ट्या अधिक फायद्याचे ठरत असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांमधून सतत नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चियाने नव्या संधीचे दार उघडले आहे.
वाशिम बाजार समितीतील सध्याचे बाजार भाव
पीक | दर (रु./क्विंटल) |
सोयाबीन | ४,०६० ते ४,२९० |
हरभरा (चना) | ५,०३० ते ५,५५५ |
मूग | ६,७१० ते ७,४८५ |
उडीद | ५,७६० ते ६,७०१ |
चिया | ११,७५० ते १४,३०० |
हे ही वाचा सविस्तर : Chia Seeds: चिया बियांचे असे आहेत चमत्कारी फायदे वाचा सविस्तर