जळगाव : बोदवड शहरातील एका खासगी मका खरेदी केंद्रावर शेतकऱ्याच्या पाच क्विंटल मका मालात वजनात घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार जामनेर तालुक्यातील राजणी येथील शेतकरी बापूराव मेटेकर यांच्या अनुभवातून समोर आला आहे.
मेटेकर यांनी मका भरलेले तीन ट्रॅक्टर एका खासगी खरेदी केंद्रावर नेले. मात्र, तेथील दर न समाधानकारक वाटल्याने त्यांनी तात्पुरती वजनाची पावती घेतली व दुसऱ्या, अधिक नामांकित केंद्रावर गेले. तेथे काट्यावर पुन्हा वजन घेतले असता, पहिल्या केंद्राच्या तुलनेत सुमारे पाच क्विंटल मका अधिक भरत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी पहिल्या खरेदी केंद्रावरच जाऊन केंद्र चालकाला घेरले. चर्चेनंतर केंद्र चालकाने 'काट्यावर नवीन माणूस बसल्याने चुकून कमी वजन दाखवले गेले' अशी कबुली दिली. त्यांनी बंद खोलीत समजूत घालत प्रकरण मिटवले. या प्रकारामुळे शहरातील खरेदी केंद्रांवरील शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत झाला असून, प्रशासनाने अशा प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
शेतकरी बापूराव मेटेकर यांच्या सर्तकतेमुळे फसवणूक उघडकीस आली. पहिल्या केंद्रावर पाच क्विंटल मका कमी दाखवला गेल्याचे स्पष्ट होताच शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. तर 'नवीन व्यक्तीमुळे चूक झाली सदर व्यक्ती नवीन असल्याने आम्ही तक्रार दाखल केली नाही' अशी प्रतिक्रिया शेतकरी बापूराव मेटेकर यांनी दिली.