धुळे : कृषीप्रधान महाराष्ट्र असूनही, कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल सातत्याने घटत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. राज्याच्या कृषी महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या १६ हजार ८३० जागांपैकी ३,००० जागा म्हणजेच सुमारे १८ टक्के जागा यंदा रिक्त राहिल्या आहेत. यामुळे 'शेतीत कोण करियर घडवणार? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विविध कृषी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचे स्वारस्य नसणे, कृषी क्षेत्रात नोकऱ्यांची शाश्वती कमी वाटणे आणि भविष्यातील विद्यार्थ्यांमध्ये संधींविषयी संभ्रम असणे, ही यामागची प्रमुख कारणे मानली जात आहेत. कृषी अभ्यासक्रमांकडे पाठ फिरवून अनेक विद्यार्थ्यांनी याउलट तांत्रिक अभ्यासक्रमांना अधिक पसंती दर्शवली आहे.
कृषी शिक्षणाचे भवितव्य ?
जर कृषी क्षेत्रात शिक्षण घेतलेले तरुण उपलब्ध नसतील, तर शेतीत नवीन तंत्रज्ञान, आधुनिकीकरण आणि व्यवस्थापन यांचा समावेश करणे कठीण होईल. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या कृषी क्षेत्रासाठी हे चांगले संकेत नाहीत. कृषी शिक्षण अधिक आकर्षक, रोजगार-भिमुख आणि उद्योजकता-पूरक बनवण्याची गरज आहे.
स्थानिक परिणाम :
या राष्ट्रीय स्तरावरील प्रवृत्तीचा परिणाम जिल्ह्यातही दिसून आला आहे. धुळे जिल्ह्यातही कृषी अभ्यासक्रमाच्या जवळपास ५ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रात करियर घडवण्यास तरुण पिढी फारशी उत्सुक नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. दरम्यान, यामुळे कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा फारसा कल दिसत नाही.
जनजागृतीची गरज :
कृषी शिक्षणाचे महत्त्व, कृषी क्षेत्रातील नोकरीच्या संधी आणि कृषी क्षेत्रातील आधुनिकीकरण यावर अधिक जनजागृती करण्याची गरज या परिस्थितीमुळे अधोरेखित झाली आहे. कृषी क्षेत्राला पुन्हा आकर्षक बनविण्यासाठी आणि तरुण पिढीला या क्षेत्राकडे वळवण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.