चपळगाव : मागील वर्षी तुरीचे बंपर उत्पादन झाले होते. अन् मार्केट कमिटीत हमीभावापेक्षाही जास्तीचा दर मिळाला होता. याउलट यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे तुरीचे उत्पादन ७५ टक्क्यांनी घटले आहे.
उत्पादन कमी झाले असताना, प्राप्त झालेल्या तुरीच्या पिकाला हमीभावापेक्षा जास्तीचा दर मिळणे अपेक्षित असतानाही पाहिजे तसा दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
केंद्र सरकारने २०२४-२५ आणि २०२५-२६ या हंगामांसाठी तुरीचा हमीभाव ७,५५० ते ८,००० रुपयांच्या दरम्यान जाहीर केला आहे.
पण अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना बाजारात यापेक्षा कमी दर मिळत असल्याने, सरकारकडून १०० टक्के तूर खरेदीची मागणी जोर धरत आहे.
सध्या अक्कलकोट, दुधनी, सोलापूर, लातूर यांसह इतरच्याही बाजारात प्रत्यक्षात ६४०० पासून ७२०० पर्यंतच दर मिळत आहे.
२०२५-२६ च्या हंगामात केंद्र सरकारने तुरीच्या हमीभावात ४५० रुपयांची वाढ करून तो ८००० रुपये केला आहे.
अतिवृष्टीचा बसला फटका
सद्यःस्थितीत हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी नाराज झाले आहेत. त्यातच झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर पुढील वर्षी तुरीचे उत्पादन घेऊ का नको, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागील वर्षी सर्वाधिक दर
◼️ हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत असल्याने शेतकरी सरकारकडून हमीभावाने तुरीची खरेदी करण्याची मागणी करत आहेत.
◼️ मागील वर्षी तुरीचा हमीभाव हा ७,५०० रु. प्रतिक्विंटल असतानाही दुधनीच्या मार्केटमध्ये ९,००० रुपये प्रति क्विंटल, असा तुरीने भाव खाल्ला होता.
◼️ यावर्षीही हीच परिस्थिती कायम असेल, या अपेक्षेने अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली होती.
यंदाच्या वर्षी तुरीचे सरासरी उत्पन्न ७५ टक्क्यांनी घटलेले आहे. अतिवृष्टी झाल्याने पाणी लागून कित्येकांचे तूर तेव्हाच गेले आहे. गतवर्षी उत्पन्न चांगले झाले अन् हमीभावापेक्षा जास्तीचा दर मिळाला. यंदा तूर उत्पादन कमी असल्याने दर जास्तीचा मिळेल, अशी अपेक्षा आहे. पण, सध्या हवा तेवढा दर मिळत नसल्याने भ्रमनिरास झाला आहे. - दाऊद पटेल, शेतकरी, चपळगाव
मागील वर्षी तुरीला हमीभावापेक्षाही जास्तीचा दर मिळाला होता, हे वास्तव आहे. मात्र, यंदा ती परिस्थिती नाही. सध्या दुधनी मार्केट कमिटीच्या आवारात तुरीची आवक सुरू आहे. जशी आवक वाढेल, तशी भाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तुरीचे उत्पन्नही कमी झाल्याने भविष्यात भाव वाढेल. आमच्या मार्केट कमिटीने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. आलेल्या मालाला नाव न ठेवता, चाळणी न करता जागेवर वजन करून तत्काळ पट्टी दिली जाते. - अप्पू परमशेट्टी, सभापती, दुधनी मार्केट कमिटी
अधिक वाचा: शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलला; नवीन रेखांकनात जिल्ह्यातील 'या' गावांचा समावेश होणार
