रब्बी हंगामातील शेतमालाची गेल्या १५ दिवसांपासून आवक वाढत आहे. बुधवारी मका, ज्वारी, गहू, बाजरी या धान्यांची बंपर आवक झाली. त्यासोबतच कांद्याचाही ओघ वाढल्याने जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावबाजार समिती परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मात्र, सायंकाळपर्यंत एकूण १८ हजार क्विंटल शेतमालाचा लिलाव पूर्ण करण्यात आला. यंदा परिसरात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने ज्वारी, मका, गहू, बाजरी या पिकांनी चांगले उत्पादन दिले आहे. भूजलपातळीही वाढल्याने रब्बी हंगाम बहरला आहे.
त्यामुळे बाजार समितीत विक्रमी आवक होत असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत. बुधवारी सकाळपासूनच शेतमालाने भरलेल्या वाहनांची गर्दी वाढली होती. दुपारी या रांगा घाटरोडवर सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत पोहोचल्या.
मक्याला १८०० रुपये प्रति क्विंटल दर
बुधवारी एकूण ६८० वाहनांमधून मका, ज्वारी, बाजरी व गहू बाजार समितीत दाखल झाले. त्यापैकी २४० वाहनांमधून मका विक्रीस आला होता. मक्याला १८०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
कांद्याची आवक वाढली, दर मात्र घसरले
• लाल कांद्याचीही आवक मोठ्या प्रमाणात होत असून बुधवारी २५० वाहनांमधून सुमारे ६२५० क्विंटल कांदा बाजारात आला. मात्र दरात अपेक्षित वाढ नसल्याने उत्पादकांमध्ये नाराजी आहे. किरकोळ बाजारातही कांद्याचे दर घसरले आहेत.
• वाढत्या गर्दीमुळे लिलाव प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याने बाजार समितीने वाहनांना टोकन देण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून टोकननुसारच वजन व लिलाव प्रक्रिया पार पडणार असल्याने कामकाज अधिक सुरळीत होणार आहे.
बुधवारी धान्य व कांद्याची विक्रमी आवक झाली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ६८० वाहनांमधून शेतमाल आला होता. आजपासून टोकन प्रणाली लागू करण्यात येत असून यानुसारच लिलाव केले जातील. - प्रदीप पाटील, सभापती, बाजार समिती, चाळीसगाव.
