Join us

Kharbuj Bajar Bhav : आठवडाभरापूर्वी ३० रुपये किलो असलेल्या खरबुजाला आता कसा मिळतोय भाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:14 IST

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या खरबुजाची दैनंदिन आवक वाढली आहे. या वाढत्या आवकमुळे खरबुजाच्या बाजारभावात मात्र लक्षणीय घसरण झाली आहे.

मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या खरबुजाची दैनंदिन आवक वाढली आहे. या वाढत्या आवकमुळे खरबुजाच्या बाजारभावात मात्र लक्षणीय घसरण झाली आहे.

आठवडाभरापूर्वी ३० रुपये किलो असलेला भाव १० ते १२ रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरबूज लागवडीवर झालेला खर्च वसूल करणेही अवघड झाले आहे.

उन्हाळ्यात थंडावा देणारे फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खरबुजाची लागवड फेब्रुवारीत करण्यात आली होती आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून काढणी सुरू झाली.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव, खडकी, चांडोली, निरगुडसर, पारगाव, काठापूर, लाखणगाव भागातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी मंचर बाजार समितीत आणत आहेत.

उन्हाळ्यामध्ये खरबुजाला मागणी वाढून जास्त बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा ठेवून अनेक शेतकऱ्यांनी खरबुजाची लागवड केली होती. परंतु, मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने भावावर नकारात्मक परिणाम झाला आहे.

बाजारात कुंदन खरबुजाला विशेष मागणी असली तरी रॉयल आणि विजय या जातींचे खरबूजही विक्रीसाठी दाखल होत आहेत.

मागील आठवड्यात चांगल्या प्रतीच्या खरबुजाला ३० रुपये किलोचा भाव मिळाला होता. पण, आता १० ते १२ रुपये किलोवर लिलाव होत आहेत. दरम्यान, या भावामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. काही शेतकऱ्यांनी माल बाजारात आणलाच नाही.

४० ते ५० रुपये किलोला भाव मिळणे अपेक्षित- शेतकरी ओंकार भरत फल्ले यांनी सांगितले की, खरबूज लागवडीपासून ते बाजारात येईपर्यंत एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो.- एकरी १२ ते १४ टन उत्पादन मिळते आणि ९,००० रोपांची लागवड होते. यात काढणी आणि वाहतुकीचा खर्चही मोठा आहे.- त्यामुळे खरबुजाला किमान ४० ते ५० रुपये किलो भाव मिळणे अपेक्षित आहे. परंतु, सध्याचा मातीमोल भाव शेतकऱ्यांना तोट्यात टाकणारा आहे.- मंचर बाजार समितीतील व्यापारी धनेश निघोट यांनी सांगितले की, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खरबुजाची आवक वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे.- ऐन उन्हाळ्यात खरबुजाचा उठाव कमी झाला असून, मागणीपेक्षा उत्पादन जास्त असल्याने भाव १० ते १२ रुपये किलोवर स्थिरावले आहेत.- या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, खर्च वसुलीची चिंता वाढली आहे.

खरबुजाचा हंगाम साधारण फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरू होतो आणि जूनपर्यंत चालतो. सुरुवातीच्या काळात थंडी असल्याने मागणीदेखील कमी असते. उन्हाळ्याची चाहूल लागली आणि वातावरणातील तापमान वाढू लागल्यानंतर मात्र मागणी आणि आवकही वाढू लागते. यादरम्यान खरबुजाचे प्रति किलो सरासरी दर थोडेसे कमी असतात, परंतु उन्हाळ्यात ते २० ते २५ रुपयांदरम्यान पोहोचतील अशी शक्यता वाटत आहे. - नीलेश थोरात, सभापती मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती

अधिक वाचा: २० गुंठे कारल्याची शेतीने शेतकरी प्रमोद यांना मिळवून दिला आर्थिक गोडवा; वाचा सविस्तर

टॅग्स :बाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीफळेफलोत्पादनमंचरशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापन