आकाश येवले
राहुरी : दीपावलीचा सण, सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडलेले, पण शेतकऱ्याच्या 'पांढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दर मिळत आहे. पावसात भिजलेला कापूस ४ हजार ५०० रुपये व चांगला कापूस ७ हजार रुपये दराने विकला जात आहे.
यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यात व्यापाऱ्यांची काटामारी, मजुर मिळत नाहीत आणि पावसाचा फटका अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
राहुरी तालुक्यातील अनेक बाजारपेठांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता, काही व्यापारी काटामारी तसेच क्विंटलमागे दोन किलोपर्यंत घट घेत असल्याचे प्रत्यक्ष निदर्शनास आले.
यावर एका व्यापाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आमचे वजन काटे अचूक आहेत. आम्ही कोणतीही फसवणूक करत नाहीत. सध्या मिल सुरू नसल्याने दर कमी आहेत. पुढील महिन्यात भाव ८ ते ८ हजार ५०० पर्यंत जाऊ शकतात.
पावसाची हजेरी, मजूर सुट्टीवर, वेचणी ठप्प
शुक्रवारी (दि. २४) झालेल्या पावसामुळे कापसाच्या वेचण्या अडकल्या. दीपावलीच्या सुटीमुळे मजूर वर्ग गावाकडे गेल्याने शेतात काम करणारे हात कमी झाले. त्यामुळे उत्पन्नात जवळपास निम्म्याने घट झाली. शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
शासनाने ८,१०० रुपयांच्या हमीभावाने कापूस खरेदी त्वरित सुरू करावी. वजन मोजणी पथक तैनात करून काट्यांची तपासणी करावी. व्यापाऱ्यांनी क्विंटलला दोन किलो घट बंद करावी. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार. - रवींद्र मोरे, प्रदेश उपाध्यक्ष, शिवसेना शेतकरी सेना
खतं, बियाणं, मजुरी सगळं वाढले आहे. पण कापूस मात्र तोट्यात जातो आहे. व्यापारी काटामारी करतात, सरकार गप्प बसते. मग शेतकरी काय करणार?' शासनाने मदत जाहीर केली असली तरी ती अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. खर्चाचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा. - संकेत गाडे, शेतकरी
अधिक वाचा: पुढील पाच दिवस राज्यातील 'या' भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार
