छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड येथील कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत विठ्ठलपूर शिवारातील पाणपोई फाटा येथे सुरू असलेले मार्केट टोमॅटो शेतमालाची आवक घटल्यामुळे रविवारी सायंकाळी तात्पुरते बंद करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सचिव कुणाल कदम यांनी दिली.
टोमॅटो मार्केट सुरू असल्यामुळे कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना टोमॅटो विक्रीसाठी निश्चित व सोयीचे ठिकाण उपलब्ध झाले होते. मात्र, अचानक बाजार समितीने मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आता खासगी व्यापाऱ्यांकडून दरात मनमानी होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कुणाल कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यास काही दिवसांसाठी बाजार बंद ठेवण्यात येतो. आवक वाढल्यानंतर पुन्हा टोमॅटो मार्केट त्वरित सुरू करण्यात येईल.
सध्या ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो मार्केटमध्ये आपला शेतमाल विक्रीसाठी दिला असून, व्यापाऱ्यांकडून पैसे मिळणे बाकी आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांची रक्कम वेळेत मिळणार असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
व्यापाऱ्याच्या सातबाऱ्यावर २० लाखांचा बोजा
दरम्यान, वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कार्यरत असलेल्या एका कांदा व्यापाऱ्याने सुमारे ४०० शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून त्यांचे पैसे न देता दोन कोटी रुपयांच्या रकमेची त्यांची फसवणूक केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कन्नड बाजार समितीने खबरदारी घेत टोमॅटो विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या पैशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गेल्या वर्षापासून प्रत्येक व्यापाऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर २० लाख रुपयांचा बोजा टाकला असल्याचे बाजार समितीने सांगितले.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
