पारनेर : बाजार समितीमध्ये शुक्रवारी (दि. १२) झालेल्या लिलावात लाल कांद्याला ४० रुपये, तर गावरान कांद्याला २९ रुपये प्रतिकिलो भाव मिळाल्याची माहिती सभापती किसनराव रासकर व सचिव सुरेश आढाव यांनी दिली.
उपसभापती किसनराव सुपेकर व बाबाजी तरटे यांनी सांगितले, की मागील दोन-तीन लिलावापासून कांद्याच्या दरात चढ-उतार दिसून आले.
शुक्रवारी बाजार समितीच्या आवारात नवीन लाल कांदा १४ हजार २४१ गोण्या, तर १२ हजार ६१६ जुना कांदा गोणी, अशी एकूण २६ हजार ८५७ कांदा गोण्यांची आवक झाली.
गेल्या चार ते पाच महिन्यापासून कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले होते, मात्र नवीन लाल कांद्याला भाव वाढल्याने शुक्रवारी बाजार समितीत लाल कांद्याला विक्रमी ४ हजार रुपये भाव मिळाला.
४ ते ५ वक्कलला ३,२०० ते ३,५०० रुपये, तर एक नंबर कांदा २,८०० ते ३,१०० रुपये, दोन नंबर कांदा २,२०० ते २,७०० रुपये, तीन नंबरला १,४०० ते २,१०० रुपये भाव मिळाला.
गावरान कांद्याला अपवादात्मक भाव २,९०० रुपये क्विं. मिळाला. ४ ते ५ वक्कलला २,६०० ते २,७०० रुपये, एक नंबरला २,२०० ते २,५०० रुपये, दोन नंबरला १,८०० ते २,१०० भाव मिळाला.
प्रतवारी करून कांदा आणा
◼️ सध्या बाजार समितीमध्ये गावरान व नवीन लाल कांद्याची आवक वाढली असून, कांद्याची गुणवत्ता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लिलावासाठी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.
◼️ नवीन लाल कांदा चांगला वाळवून प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा, असे आवाहन संचालक शंकर नगरे, डॉ. पद्मजा पठारे यांनी केले आहे.
