चाकण खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये रविवारी, २१ सप्टेंबर २०२५ रोजी शेतीमालाची मोठी आवक नोंदवली गेली.
विशेषतः रताळे, कांदा, लसूण आणि हिरव्या मिरचीची प्रचंड आवक झाल्याने भाव स्थिर राहिले. याशिवाय, दुधीभोपळा, गाजर, चवळी, वालवड आणि फ्लॉवरच्या आवकेतही लक्षणीय वाढ झाली.
पालेभाज्यांच्या विक्रमी आवकेमुळे भावात घसरण झाली असून, एकूण उलाढाल ४ कोटी ८० लाख रुपये नोंदवली गेली. आडतदार गणेश झगडे यांच्या गाळ्यावर रताळ्याची प्रचंड आवक लक्षवेधी ठरली.
कांद्याची एकूण आवक १,०५० क्विंटल नोंदवली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत २०० क्विंटलने कमी होती. कांद्याचा कमाल भाव १,५०० रुपये प्रति क्विंटल स्थिर राहिला. भाव क्रमांक २ आणि ३ अनुक्रमे १,२०० रुपये आणि ८०० रुपये होते.
बटाट्याची आवक २,००० क्विंटल स्थिर, परंतु भावात २०० रुपयांची घट होऊन कमाल भाव २,००० वरून १,८०० रु. क्विंटलवर स्थिरावला.
लसूण आणि हिरवी मिरची
लसणाची आवक ५० क्विंटल नोंदवली गेली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत १५ क्विंटलने जास्त होती. यामुळे लसणाचा कमाल भाव १० हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला. हिरव्या मिरचीची आवक ४३५ क्विंटल होती, आणि भाव १,५०० ते २,५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले.
अधिक वाचा: आता घरबसल्या मिळणार जुने दस्त; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुरु केली 'ही' नवीन सुविधा