चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये रविवारी (दि. १२) कांदा, बटाटा, डांगर भोपळा आणि टोमॅटोच्या भावात तेजी दिसून आली.
कांद्याची आवक दुपटीने वाढली असून, बटाट्याची आवक वाढूनही भावात २०० रुपयांची वाढ झाली. मात्र, टोमॅटो, कोबी, वांगी, फ्लॉवर आणि शेवग्याची आवक किंचित घटली.
पालेभाज्यांमध्ये मेथी आणि कोथिंबिरीची आवक वाढल्याने त्यांच्या भावात घसरण झाली. बाजारातील एकूण उलाढाल ६ कोटी ५० लाख रुपये इतकी झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ३,००० क्विंटल झाली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. यामुळे कांद्याचा कमाल भाव १,५०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावला, तर इतर भाव १,००० रुपये आणि ८०० रुपये प्रति क्विंटल राहिले.
बटाट्याची आवक ४,५०० क्विंटल इतकी झाली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत २,२५० क्विंटलने जास्त आहे. तरीही बटाट्याचा कमाल भाव १,८०० रुपयांवरून २,००० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला, तर इतर भाव १,५०० आणि १,००० रुपये प्रति क्विंटल राहिले.
लसूण आणि हिव्या मिरचीचे भाव
लसणाची आवक २० क्विंटल झाली असून, त्याला ८,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ३९५ क्विंटल होती आणि भाव ३,५०० ते ४,५०० रुपये प्रति क्विंटल राहिले.
अधिक वाचा: नवीन गाळप हंगामाचे धोरण ठरले; यंदा गाळप होणाऱ्या उसासाठी कसा मिळणार दर?