घोडेगाव : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात कांद्याचे भाव स्थिर आहेत.
बुधवारी (दि. १२) झालेल्या लिलावात एक-दोन वक्कलसाठी २२०० रुपये क्विंटल भाव मिळाला. सरासरी १३०० ते १६०० रुपये भाव कांद्याला मिळाला.
घोडेगाव उपबाजारात मागील आठवड्याच्या तुलनेने आवक घटली असून, कांद्याची मागणीही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
बुधवारी (दि. १२) बाजार समितीत एकूण ४४ हजार ६०९ कांदा गोण्यांची आवक झाली. लिलावात एक-दोन लॉट प्रतिक्विंटल २२०० रुपये क्विंटल भाव मिळाला.
मोठा कांदा १५०० ते १७००, मुक्कल भारी ११०० ते १३००, गोल्टी ७०० ते ९०० जोड कांदा बदला १०० ते ३०० रुपये भाव मिळाल्याचे आडतदार श्रीकांत बेल्हेकर यांनी सांगितले.
बांगलादेशने भारतीय कांदा आयातीवरील कर वाढविल्याने त्या देशातील कांदा निर्यातीचे प्रमाण कमी होत आहे. तसेच देशात मोठ्या प्रमाणात कांदा असल्याने बाजारात कांद्याचे भाव स्थिर आहेत. - अशोक खाडे, उपाध्यक्ष, व्यापारी असोशिएशन, घोडेगाव
दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कांद्याची दरवाढ होत असते, मात्र यावर्षी गावरान उन्हाळ कांद्याचे अतिरिक्त उत्पन्न झाल्याने बाजारात उन्हाळी गावरान कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने बाजारात कांद्यास हवी तशी मागणी नसल्याने यावर्षी दरवाढ झाली नाही. - संतोष वाघ, कांदा आडतदार, घोडेगाव
अधिक वाचा: सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रथमच मिळणार नॉमिनी सुविधा; कसा होणार फायदा?
