केंद्र सरकारने निर्यातबंदी शुल्क हटविल्यावर कांद्याचे बाजारभाव वाढतील, अशी शेतकऱ्यांमध्ये असलेली आशा फोल ठरली आहे.
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात कांद्याची आवक साधारण असली तरी कांदा एक हजार ते तेराशे रुपये क्विंटलने विकला जात आहे.
चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. रब्बी हंगामात इतर पिकांपेक्षा कांद्यातून चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
मात्र, कांद्याला भाव न वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या बाजार समितीत सुमारे एक हजार ते एक हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल दर कांद्याला मिळत आहे.
यामुळे उत्पादन खर्च काढणेही कठीण झाले आहे. कांद्याची प्रत उत्तम असली तरी दर नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.
कांदा साठवण्याकडे शेतकऱ्यांचा कल
गेल्या दीड महिन्यापासून कांद्याचे दर स्थिर आहेत. बाजारभाव कमी असल्याने कांदा उत्पादकांचा पुरता वांधा केल्याने कांदा चाळीत साठवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर २० टक्के शुल्क लादले होते. परंतु, शेतकऱ्यांच्या विरोधानंतर १ एप्रिलपासून हे शुल्क हटवण्यात आले. त्यानंतर बाजारभाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, १ एप्रिलपासून आजपर्यंत बाजारभावात काहीच वाढ झाली नाही. - विजयसिंह शिंदे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खेड
कांद्याला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये २० ते २५ रुपये किलोला बाजारभाव होता. तो टिकून राहील, असे सर्वच शेतकऱ्यांना वाटले होते. परंतु बाजारभाव कमी होऊन १० ते १३ रुपये किलोवर आला. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. यासाठी चाळीत कांदा साठवणुकीवर भर दिला. भविष्यात बाजारभाव वाढतील हीच अपेक्षा आहे. - मयूर शिवेकर, प्रगतशील शेतकरी, करंजविहिरे
काही शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामातील पिकाच्या भांडवली खर्चासाठी नाइलाजास्तव कांद्याची विक्री करावी लागत आहे. कांद्याला योग्य दर मिळावा, यासाठी केंद्र सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. - संभाजी कलवडे, आडतदार, कांदा बटाटा मार्केट
अधिक वाचा: शेतात गाळ भरताय? कोणत्या प्रकारचा गाळ भरणे योग्य? जाणून घ्या सविस्तर