चाकण : खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चाकणच्या महात्मा फुले उपबाजारात कांद्याच्या दरातील घसरण सुरूच असून, नवीन कांद्याची विक्री सुरू झाल्याने त्यांचा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
नवीन कांद्याची आवक वाढत असल्याने कांद्याच्या दरात क्विंटलमागे १५०० ते २००० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळत होता. चांगला जुना कांदा सुमारे ७० रुपये किलोपर्यंत विकला गेला होता.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यानंतर केंद्र सरकारने अफगाणिस्तानचा कांदा आयात केला. यामुळे कांद्याचे बाजारभाव पडतील या विचाराने शेतकऱ्यांनी आपला जुन्या कांद्याबरोबर नवीन कांदा काढणीस सुरवात केली.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जरी अफगाणिस्तानचा कांदा बाजारात येत होता, तरीही ५० ते ६० रुपये एवढा भाव टिकून राहिला होता. मात्र, मागील काही दिवसांत ढगाळ वातावरण झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढणीस मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली. त्यामुळे बाजारभाव गडगडायला सुरुवात झाली.
चाकणच्या बाजार समितीत बुधवारी (दि. १८) झालेल्या कांद्याच्या लिलावात सुमारे ७,५०० क्विंटलची आवक झाली. १ नंबर कांदा २,२०० ते २,५००, २ नंबर कांदा १,८०० ते २,००० गोल्टी कांदा १,५०० ते १,२०० असा क्विंटलला बाजारभाव मिळाला, असे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले.
कांद्याचे भाव घसरण्यामागे वाढलेल्या आवकचा दबाव आणि निर्यातीमधील अडथळे ही कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कांद्याचे भाव कमी झाले आहेत. शेजारील देशाचा कांदा बाजारात आल्याने, तसेच बांगला देशात आपल्या कांद्याऐवजी पाकिस्तानच्या कांद्याला पसंती मिळत आहे. भारताच्या कांद्या निर्यातीवर आजही २० टक्के निर्यात शुल्क आहे, याचा फटका कांदा भावाला बसत आहे. सरकारने कांदा निर्यात शुल्क तातडीने मागे घ्यावे. - विजयसिंह शिंदे, सभापती