Join us

Kanda Bajar Bhav : अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान; बाजारभाव वाढतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:28 IST

एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान केले असतानाच आता कांद्याला घोडेगाव (ता. नेवासा) उप बाजारात सरासरी केवळ आठशे ते अकराशे रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळत आहे.

घोडेगाव : एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान केले असतानाच आता कांद्याला घोडेगाव (ता. नेवासा) उप बाजारात सरासरी केवळ आठशे ते अकराशे रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळत आहे.

त्यामुळे एकीकडे पाऊस अन् दुसरीकडे घटलेला दर अशा दुहेरी अडचणीत शेतकरी सापडला आहे. अनेक ठिकाणी वादळासह गारपीट, अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या गहू, बाजरी, केळी, कांदा पिकांची मोठी नासाडी झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

अवकाळी पावसामुळे अनेकांचा कांदा भिजला. तसेच कांदा साठवणूक करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा विकल्याशिवाय पर्याय नाही.

अशातच घोडेगाव येथील कांदा उपबाजारात शनिवारी (दि.५) कांद्याला सरासरी आठशे ते अकराशे रुपये भाव मिळाला. एक, अर्ध्या वक्लकसाठी तेराशे ते चौदाशे रुपये भाव मिळाला.

यामुळे उत्पन्न खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. घोडेगाव आवारात एकूण आठ हजार दोनशे गोण्यांची आवक झाली होती. गेल्या पंधरा वर्षात कांद्याची सर्वात ही निचांकी आवक असल्याची नोंद करण्यात आली.

गेल्या काही वर्षात कांद्याला वर्षातील काही दिवस चांगला भाव हमखास मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांद्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे बाजारातही मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीस येतो.

मात्र भाव मिळत असल्याने शेतकरी कांदा विक्री न करता साठवणूक करण्यावर भर देतात. अपेक्षित भाव मिळाल्यानंतर शेतकरी कांदा विक्रीस घेऊन जातात. सध्या भाव कमी झाले आहेत.

शेतकऱ्यांनी कांदा चाळीत ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील आवकही कमी झाली आहे. अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांनी कांदा भरणेही बंद केले आहे. त्याचाही परिणाम आवक कमी होण्यात झाल्याचे दिसते. 

कांदा निर्यात जरी सुरू असली तरीही बाहेरील देशांमध्ये भारतीय कांद्यास मागणी कमी आहे. तसेच महाराष्ट्रातून कांदा पुरवठा होत असलेल्या इतर राज्यांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला इतर राज्यातही मागणी कमी आहे. त्याचा परिणाम कांद्याचे दर घसरण्यावर झाला आहे. - सुदाम तागड, कांदा आडतदार, घोडेगाव

नेवासा बाजार समितीचा घोडेगाव कांदा उप बाजार २००३ मध्ये सुरू झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा आवक होत राहिली. पाच ते सहा वर्षांनी घोडेगाव उप बाजारात एका दिवसाला दहा टनाच्या चारशे ते पाचशे गाड्या आवक होऊ लागली होती. त्यामुळे घोडेगाव हे महाराष्ट्रातील प्रमुख कांदा मार्केट म्हणून ओळखले जात होते. शनिवारी मात्र प्रथमच सर्वात निचांकी कांदा आवक झाल्याची नोंद झाली. - अशोक नाना येळवंडे, अध्यक्ष, कांदा व्यापारी असोसिएशन

अधिक वाचा: खोरच्या युवा शेतकऱ्याचा कलिंगड उत्पादनात विक्रम; आंतरपीक म्हणून मिरचीचा यशस्वी प्रयोग

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपाऊसपीकपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनेवासाशेतकरीशेतीमहाराष्ट्र