कोल्हापूर : खरीप हंगामातील कांदा सध्या बाजारात आल्याने आवक एकदम वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून, घाऊक बाजारात दर निम्यावर आले आहेत.
चांगल्या प्रतीचा कांदा सरासरी ३० रुपयांपर्यंत खाली आला असून, मध्य प्रदेश व कर्नाटकातील मार्केटही कांद्यांनी फुल्ल झाली आहेत. गेल्या दीड-दोन महिन्यांत कांद्याने कमालीची उसळी घेतली होती.
परतीच्या पावसाने नवीन कांदा खराब झाला आणि चाळीतील कांदा संपल्याने तेजी आली होती. घाऊक बाजारात प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांपर्यंत दर पोहोचला होता.
मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून नवीन कांद्याची आवक बाजारात होऊ लागल्याने दर घसरू लागले आहेत. शनिवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये तब्बल ११ हजार ७१५ पिशव्यांची आवक झाली होती.
प्रतिकिलो १० ते ३५ रुपये दर राहिला असून, चांगल्या प्रतीचा कांदा ३० रुपयांपर्यंत होता. मध्य प्रदेश, कर्नाटकातही कांद्याची आवक वाढल्याने तिथेही दर घसरले आहेत. आगामी दोन महिने दरात फारशी वाढ होणार नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
बाजारात नवीन कांद्याची आवक झाल्याने दर घसरले आहेत. परराज्यातही कांद्याची आवक चांगली असल्याने किलोमागे सरासरी पाच रुपये कमी झाले आहेत. - उदय देसाई, व्यापारी, कांदा-बटाटा