Join us

Kanda Bajar Bhav : परराज्यांतून कांद्याला मागणी वाढली नव्या कांद्याच्या बाजारभावात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:10 IST

जिल्ह्यातील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये जुन्या कांद्याची आवक घटल्याने त्याचे भाव गगनाला भिडले.

चाकण : जिल्ह्यातील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये जुन्या कांद्याची आवक घटल्याने त्याचे भाव गगनाला भिडले तर नवीन कांद्याची आवक वाढूनही कांद्याला ४० ते ४५ रुपये बाजारभाव मिळत असल्याचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी सांगितले.

खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात अहिल्यानगर जिल्ह्यातून नवीन कांद्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ४० ते ४५ रुपये दर मिळत आहे.

बाजारात रोज हजार ते पंधराशे पिशवीची आवक होत आहे. तर किरकोळ बाजारात हाच कांदा ६० ते ७० रुपये भावाने विक्री होत आहे. बराकीत साठवणूक केलेल्या जुन्या कांद्याची आवक जवळपास संपली आहे.

काही प्रमाणात जुन्या कांद्याची आवक होत आहे त्याला ६० ते ७० रुपये बाजारभाव मिळत आहे. नवीन कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनही भाव खात आहे.

हाच कांदा किरकोळ बाजारात ७० रुपये प्रतिकिलो विकला जातो आहे. जानेवारी महिन्यानंतर कांद्याचे भाव उतरतील असे बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले.

परराज्यांतून मागणीकांद्याला तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांतून मागणी होत असल्याने मार्केट यार्डातून कांदा दक्षिण भारतात जात आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचा दर पुढील काही महिने तेजीत असेल, असे बाजार समितीचे संचालक महेंद्र गोरे सांगत आहेत.

चाकण बाजारात लगतच्या जिल्ह्यातील नवीन कांद्याची आवक सुरू आहे. वाखारीत साठवलेला कांदा संपला असल्याने बाजारात विक्रीसाठी येत नाही. कांद्याची मागणी असल्याने आवक असूनही भाव तेजीत राहत आहे. पुढील एक दोन महिन्यांत कांद्याची आवक वाढून बाजारभाव नियंत्रणात येतील. - संभाजी कलवडे, कांदा-बटाटा आडतदार

अधिक वाचा: Kanda Pil Rog : कांदा पिकावरील पिळ रोगाच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डचाकणपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीशेतीआंध्र प्रदेशतामिळनाडूकेरळपुणेखेड