सोलापूर : बाजारात शहरातील बाजारपेठेत कलिंगडाचा हंगाम सुरू झाला आहे आणि वातावरणामुळे फळांचेही चांगले उत्पादन होऊ लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातून कलिंगडाची आवक होत आहे.
सध्या किरकोळ बाजारात दोन रूपये ते चौदा रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री होत आहे. बाजारात संत्री, मोसंबी, पेरू, सीताफळ, द्राक्षे, सफरचंद, पपई, कलिंगड, अननस यासारख्या देशी फळांची आवक वाढायला सुरुवात झाली आहे.
त्यांना चांगली मागणी असल्याने गेले काही दिवस थंडावलेल्या बाजारात आता पुन्हा उत्साह निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर फळबाजारात जिल्ह्यातून सिडलेस कलिंगडाची आवक सुरू झाली आहे. त्यात बियांचे प्रमाण कमी असून, आतील भाग लालभडक आहे.
काही दिवसांत आवक व्यवस्थित
■ यंदा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवड कमी झाली. परिणामी डिसेंबरमध्येही कलिंगडाची आवक कमी आहे.
■ कलिंगडाची आवक अनेकांनी रमजान महिन्यातील मागणी लक्षात घेऊन मागील महिन्यात लागवड केली आहे. फेब्रुवारीत महिन्यात आवक व्यवस्थित सुरू होईल, अशी स्थिती आहे.
६२ क्विंटलची आवक
गुरुवारी २६ डिसेंबर रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ६२ क्विंटलची आवक झाली तर त्याला कमीत कमी दर ३०० तर जास्तीत जास्त १००० रुपये मिळाला.
काय म्हणतात व्यापारी
■ विविध प्रकारच्या कलिंगडाचा हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. त्यानंतर डिसेंबरपासून आवक वाढण्यास सुरुवात होते.
■ मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत कलिंगडाला ग्राहकांकडून मोठी मागणी असते, सध्या आवक कमी असली, तरी येत्या काळात आवक वाढत जाऊन ती उन्हाळ्यात मे महिन्यापर्यंत कायम राहते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.