उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम सुरू असला, तरी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी गृहिणी लोणच्याची तयारी जोरात करीत आहेत. त्यामुळे सध्या बाजारात लोणच्याच्या कैरीसाठी मोठी मागणी आहे.
हंगामातील पहिल्या कैऱ्या चवीला अतिशय आंबट असल्याने मीठ लावून किंवा साखरेच्या पाकात बुडवून खाण्याकडे अनेकांचा कल आहे.
लोणच्यासाठी प्रामुख्याने मकराम जातीच्या मोठ्या गोल कैऱ्यांचा वापर केला जातो. उन्हाच्या वाढीसोबतच कैरीच्या पन्ह्यासाठी, दैनंदिन आहारासाठी आणि लोणच्यासाठी या कैऱ्यांची मागणी वाढते, असे विक्रेत्यांनी सांगितले.
आहारात चवदार स्वाद आणणारे कैरीचे लोणचे सर्वाधिक लोकप्रिय आहे. लिंबू, आवळा आणि इतर प्रकारच्या लोणच्यांपेक्षा कैरीच्या लोणच्याला विशेष पसंती मिळते.
दुसरीकडे, शेतकऱ्यांसाठी गावरान आंबा हा आर्थिक लाभाचा उत्तम पर्याय आहे. मात्र, वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन शेतकरी कैरी अवस्थेतच आंब्याची विक्री करीत आहेत.
त्यामुळे बाजारात लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने कैरीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कैरी ५० ते ८० रुपयेपरराज्यातील वाढत्या मागणीमुळे कैरीच्या दरातही वाढ होत आहे. सध्या बाजारात कैरीला ५० ते ८० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. अनेक शेतकरी कैरी असतानाच आंब्याची झाडे विकत असल्याने यावर्षी गावरान आंब्याचे लोणचे महाग होण्याची शक्यता आहे.
पुढील महिन्यात कैरीचा हंगामसुरुवातीला एप्रिल आणि मे महिन्यातील कैरी बहुतांश प्रमाणात लोणचे व्यावसायिक खरेदी करतात. जून महिन्यात पहिल्या पावसानंतर बाजारात दाखल होणाऱ्या कैरीला घरगुती ग्राहक लोणचे तयार करण्यासाठी खरेदीला पसंती देतात. मार्केट यार्डात कर्नाटकासह सोलापूर, रत्नागिरी आणि पुणे येथून गावरान कैरीची आवक आहे.
अधिक वाचा: Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर