सांगली : वजन, साखर नियंत्रित राहण्यासाठी आहारात चपातीऐवजी ज्वारी-बाजरीच्या भाकरीचा समावेश करण्याचा तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो. त्यामुळे शाळू (ज्वारी) ची मागणी व पेराही वाढत आहे.
बाजारात नवीन ज्वारी दाखल झालेली आहे. जुनीही ज्वारी असल्याने दरांमध्ये तफावत आहे. अनेकजण जुनी ज्वारी नवीन ज्वारी म्हणूनही विक्री करत आहेत. प्रतिक्विंटल ज्वारीला चार हजार रुपये दर मिळत आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात उडीद, मूग, हरभरा, यासह विविध प्रकारच्या कडधान्य पिकाची लागवड केली जाते. याशिवाय मका पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. शेतकऱ्यांचा पीक लागवडीचा कल वाढत चाललेला आहे.
अधिकाधिक उत्पादन प्राप्त करण्यासाठी शेतकरी विविध पिकांची लागवड करीत आहेत. एकेकाळी जिल्ह्यात ज्वारी लागवडीचे क्षेत्र भरपूर होते; परंतु त्यात झपाट्याने घट झाली. याचाच चांगलाचा परिणाम पिकांच्या उत्पादन घटीवर झालेला दिसून येतो. मागील वर्षीपासून ज्वारीचा पेरा वाढलेला आहे.
याशिवाय मका लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. यासाठी जिल्ह्यातील सिंचन सुविधा कारणीभूत ठरत आहे. सिंचनाच्या सुविधेमुळे धान्य लागवडीकडे कल वाढला आहे.
अल्प काळात येणारे पीक
ज्वारीसह कडधान्य पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नाही. तसेच अल्प काळात पिकाची काढणी होते. ज्वारी पिकावर रोगराई येत नाही. फवारणी करावी लागत नाही. यावरील खर्चात बचत होते. सदर बाब शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
लागवडीचा खर्चही कमी
ज्वारी व कडधान्य पिकाची मशागत व लागवड खर्च कमी आहे. सदर पिकासाठी जास्त खर्च करावा लागत नाही. तसेच वारंवार पाणी देण्याची गरज नाही.
जुन्या ज्वारीला नवीन दर
बाजारात नवीन ज्वारी दाखल झालेली आहे. मात्र, बाजारात जुनीही ज्वारी असल्याने दरांमध्ये तफावत आहे. अनेकजण जुनी ज्वारी नवीन ज्वारी म्हणूनही विक्री करत आहेत. त्यामुळे अनेकजण जुन्या ज्वारीला नवीन दर लावला जात आहे.
ज्वारी काढणीला वेग
जिल्ह्यात सध्या ज्वारी, गहू, हरभरा पिकाची काढणी सुरू आहे; प्रत्येक शेतकरी पिकाची काढणी करण्यात सध्या मोठ्या प्रमाणात व्यस्त असल्याचे दिसत आहे. अशातच त्या शेतकऱ्यांना पिकाची काढणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्याचे मोठ्या अडचणीचाही सामना करावा लागत आहे.
१.२६ हेक्टरवर पेरणी
दिवसेंदिवस ज्वारीला मागणी वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीच्या पेरणीला पसंती दिली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये एक लाख २६ हजार हेक्टरपर्यंत ज्वारीची पेरणी झाली आहे. आहारात ज्वारीला पसंती मिळत आहे.
ज्वारीची भाकर आरोग्यासाठी आहारात वापरली जाते. बार्शीच्या ज्वारीला नागरिकांकडून सर्वाधिक मागणी होत आहे. ज्वारीची आवक न वाढल्यास दर वाढू शकतात. सध्या नवीन ज्वारी बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे दर स्थिर असल्याचे दिसत आहे. मात्र, ज्वारीचे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. - रवींद्र पाटील, व्यापारी