कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गुळाचे सौदे बंद राहिले. आवक कमी असल्याने एक दिवसाआड सौदे काढण्याची मागणी हमालांची आहे. तर रोजच्या रोज सौदे झाले पाहिजेत, यावर शेतकरी ठाम राहिल्याने पेच निर्माण झाला आहे.
कोल्हापूर बाजार समितीमध्ये ऑक्टोबरपासून गुळाचा हंगाम सुरू होतो. उसाच्या उपलब्धतेवर हंगामाचा कालावधी अवलंबून असतो. यंदा साखर कारखान्यांचा हंगाम लवकर संपल्याने गुऱ्हाळघरांनाही ऊस कमी पडू लागला आहे. आता काही मोजकीच गुऱ्हाळघरे सुरू आहेत.
दरवर्षी एप्रिलपासून गुळाची आवक एकदमच कमी होते. त्यावेळी गुळाचे सौदे एक दिवसाआड काढले जात होते. मात्र, यंदा गतवर्षीच्या तुलनेत आवक थोडी अधिक असल्याने रोजच्या रोज सौदे सुरू आहेत. गेल्या आठवड्यात हमाल संघटनेच्या वतीने एक दिवसाआड सौदे काढण्याची मागणी केली होती. मात्र, शेतकरी तयार नसल्याने हमालांनी सौदे काढण्यास नकार दिला.
त्यामुळे मंगळवारी गुळाचे सौदे होऊ शकले नाहीत. साधारणता मंगळवारी दहा हजार गूळ रव्याची आवक झाली होती.
तत्पूर्वी सोमवारी गुळामध्ये सिंथेटिक रंग वापरल्याचे गुजरातमधील व्यापाऱ्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी समितीच्या संबधित व्यापाऱ्याला दंड करण्यात आल्याने सौदे बंद होते.
गुळाच्या सौदे काढण्यावरून हमाल व शेतकरी यांच्यामध्ये मतमतांतरे होती. संबंधित घटकांशी चर्चा झाली असून, आजपासून सौदे पूर्ववत होतील. - तानाजी दळवी (सचिव, बाजार समिती)
गुळाची आवक कमी झाल्याने हमाली खूप कमी होते. गावाकडून येण्याजाण्याचा खर्चही निघत नसेल तर काम करून काय उपयोग? यासाठी एक दिवसाआड सौदे काढण्याची आमची मागणी आहे. - सुभाष यादव, (हमाल, गूळ विभाग)
अधिक वाचा: लाईट बिल अजून कमी होणार, आता मिळणार डिस्काउंट; कोणत्या युनिट स्लॅबला किती रुपये डिस्काउंट?
