मोबीन पटेल
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गावरान गुळाचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिशोर (ता. कन्नड) येथील बाजारपेठेत शनिवारी गूळ खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रति क्विंटलला ७ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. या खरेदीचा प्रारंभ एजाज पठाण यांच्या हस्ते करण्यात आला.
पिशोरच्या रसायन विरहित गावरान गुळास महाराष्ट्रात चांगली मागणी असून यंदा थंडी जास्त पडणार असल्याने लाडू बनविण्यासाठी गुळाची मागणी वाढणार आहे. मी दरवर्षी गुळाचे गाळप करतो, यामुळे मला चांगले उत्पन्न मिळत असल्याचे शेतकरी सुनील खडके यांनी सांगितले. पिशोर परिसरात १० गुऱ्हाळ तग धरून असून परिसरातील अनेक शेतकरी गूळ बनविण्यास प्राधान्य देतात.
दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्व गुऱ्हाळे सुरू होतात; मात्र यंदा झालेल्या अतिवृष्टीने केवळ मी गुन्हाळ सुरू केले असून अनेक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली असल्याचे गुऱ्हाळ मालक राजू शिंदे यांनी सांगितले. दरवर्षी सर्वप्रथम गूळ खरेदीस मी सुरुवात करतो. मात्र यंदा ७ हजार १०० रुपयांच्या विक्रमी भावाने खरेदीला सुरुवात झाली असून भाव स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी समाधान टोम्पे यांनी सांगितले.
यावेळी गोविंद नवले, राजू मोकासे, अशोक जाधव, शांताराम जाधव, गणेश ठोकळ, सुभाष मोकासे, सुरेश कोल्हे, गुळ्या तजमुल शेख, बाळू जाधव, फैय्याज टक्कर, संभाजी मोकासे, गणेश मोकासे आदी शेतकरी उपस्थित होते.
कारखान्याला ऊस दिल्यास वजनात होते घट
कारखान्याला ऊस दिल्यास वजनात अधिक घट होते. शिवाय पुरेसा दर मिळत नाही. त्यामुळे पिशोर परिसरातील शेतकरी गूळ काढण्यास प्राधान्य देतात. दरवर्षी येथील गुळास चांगली मागणी असल्याने भावही चांगला मिळतो; मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. गुळास चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे.