Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात कांद्याची आवक घटली; कांदा बाजारभावात दुपटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 10:50 IST

शुक्रवारी प्रजासत्ताक दिनामुळे कांद्याचा लिलाव बंद होता. शनिवारी आवक वाढेल अशी अपेक्षा होत असताना त्यात घट झाल्याचे दिसून आले. गुरुवारी ७०० ते ११०० रुपये पर्यंत दर घसरले होते बाजारात आवक वाढल्याने भाव घसरल्याचा परिणाम शनिवारी दिसून आला.

प्रजासत्ताक दिनाच्या सुटीनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक काही प्रमाणात घटली मात्र त्यामुळे कांद्याच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. शनिवारी केवळ ४०८ गाड्या कांदा मार्केट यार्ड विक्रीसाठी आला होता.

सलग येणाऱ्या सुट्या आणि कांद्याचे वाढलेले उत्पादन यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याची मोठी आवक झाली होती. तब्बल १४५० गाड्या कांदा विक्रीसाठी आल्याने बाजार समितीच्या आवारात पाय ठेवायला ही जागा नव्हती. शेवटी जनावराच्या बाजारात कांद्याची गोणी उतरून घ्यावी लागली. परिणामी गुरुवारी कांद्याचा बाजार भाव कमालीचा खाली आला होता. कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध केला होता.

शुक्रवारी प्रजासत्ताक दिनामुळे कांद्याचा लिलाव बंद होता. शनिवारी आवक वाढेल अशी अपेक्षा होत असताना त्यात घट झाल्याचे दिसून आले. गुरुवारी ७०० ते ११०० रुपये पर्यंत दर घसरले होते बाजारात आवक वाढल्याने भाव घसरल्याचा परिणाम शनिवारी दिसून आला. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी घाई करायचे नाही असा निर्णय घेतल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते. परिणामी कांद्याचे दर १५९० रुपयापर्यंत वाढले.

सांगली बाजारपेठेकडे मोर्चासोलापूर बाजार समितीच्या तुलनेत नाशिक बाजारपेठेत कांद्याचे दर कमी झालेले आहेत. कांद्याचे व्यापारी हैदराबाद सोलापूर आणि नाशिक येथील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे चांगला दर मिळतो अशी शेतकऱ्यांची भावना होती. सोलापूरचे दर घसरल्याने येथील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी सांगली बाजारपेठेकडे मोर्चा वळवला. सोलापूर जिल्ह्यातून २०० पेक्षा जास्त गाड्यांची सांगली बाजारपेठेत आवक झाल्याचे सांगण्यात आले.

कांद्याच्या दरात कमी जास्त घट किंवा वाढ होत असते. राज्यभरातील कांदा विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाजार समितीमध्ये जवळपास हीच स्थिती आहे. कांद्याचे उत्पादन वाढल्याने आणि निर्यात बंदीमुळे हा फटका बसत आहे. - दत्तात्रय सूर्यवंशी, सचिव, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

 

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डसोलापूरशेतकरीसांगली