साप्ताहिक सुट्या, प्रजासत्ताक दिन आणि बँकांच्या संपामुळे गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बुधवारी (दि. २८) रोजी पुन्हा सुरू झाले. लिलावाच्या पहिल्याच दिवशी लाल (रांगडा) कांदा व मका या दोन्ही मालाच्या आवकेत दुपटीने वाढ झाली.
परिणामी मागणी-पुरवठ्याचे संतुलन बिघडले आणि परिणामी दोन्ही पिकांच्या दरात १०० ते १५० रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. रोखीचा व्यवहार, मोठ्या प्रमाणातील खरेदीदारांची उपस्थिती, माल खरेदीसाठी चढाओढ तसेच इलेक्ट्रॉनिक भुईकाट्यांमुळे उमराणे बाजार समिती ही कांदा व मका आवकेचे माहेरघर म्हणून ओळखली जाते.
मात्र शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुट्या, सोमवारी प्रजासत्ताक दिन आणि मंगळवारी बँकांचा संप असल्याने बाजार समितीचे कामकाज चार दिवस बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा व मका विक्रीअभावी साठवून ठेवावा लागला.
लिलाव पुन्हा सुरू होताच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर माल बाजारात आणल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा व मका आवकेत दुपटीने वाढ झाली. यामुळे मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याने दरात घट झाली.
कांदा, मक्याला दर..
बाजार आवारात लाल कांद्याची सुमारे २६ हजार क्विंटल आवक झाली. यावेळी कांद्याला किमान ५०१ रुपये, कमाल १,५५१ रुपये, तर सरासरी १,२७५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर मक्याची ३९ हजार क्विंटल आवक झाली असून त्याला किमान १,४०० रुपये, कमाल १,७८५ रुपये आणि सरासरी १,६८० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
गेल्या आठवड्याचे दर..
मागील आठवड्यात शुक्रवारी लाल कांद्याचे दर कमाल १,६९१ रुपये, तर मक्याचे दर १,८९५ रुपये होते. त्या तुलनेत आज बुधवारी कांद्याला कमाल १,५५१ रुपये व मक्याला १,७८५ रुपये दर मिळाल्याने दोन्ही पिकांच्या दरात १०० ते १५० रुपयांची घसरण झाली.
Web Summary : Umrane market reopened after four days, witnessing a surge in onion and maize arrivals. This oversupply led to a price drop of ₹100-150 per quintal for both crops compared to last week's rates.
Web Summary : उमराने बाजार चार दिन बाद फिर खुला, प्याज और मक्का की आवक में वृद्धि हुई। इस अधिक आपूर्ति के कारण दोनों फसलों की कीमतों में पिछले सप्ताह की तुलना में ₹100-150 प्रति क्विंटल की गिरावट आई।