सांगली : हळदीची आवक कमी झाल्यामुळे राजापुरी हळदीला गेल्या महिन्याभरापासून प्रतिक्विंटल १७ हजारांवर दर स्थिर आहे.
उच्चांकी ६० हजारापर्यंत दर गेला होता. हलक्या प्रतिच्या हळदीलाही सोमवारी प्रतिक्विंटल १४ हजार ५०० रुपये दर होता. सहा हजार ७८० क्विंटल हळदीची आवक झाली होती. १ एप्रिलपासून आतापर्यंत दोन लाख २० हजार ५९७ क्विंटल हळदीची आवक झाली आहे.
हळदीला दर चांगला असल्यामुळे शेतकरी यावर्षी लागण वाढण्याची शक्यता आहे. पण, हळदीचे बियाणाचा खर्च एकरी १० हजार रुपयापर्यंत असल्यामुळे शेतकरी लागण करण्याकडे दुर्लक्ष करतानाही दिसत आहे.
यंदा हळदीला अच्छे दिन
२०१०-११ यावर्षी हळदीला प्रतिक्विंटल ३२ हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला होता. यावेळी सरासरी दरही १५ ते २० हजार रुपये क्विंटल दर होता पण, त्यानंतर हळदीचे दर खूपच कमी झाले. गेल्यावर्षी तर प्रति क्विंटल सहा ते नऊ हजार रुपये दर होता. यामुळे हळद लागण कमी झाली. म्हणूनच सद्या हळदीचे दर वाढले आहेत.