चपळगाव : खरीप हंगामातील पिकांना ज्या पद्धतीने समाधानकारक भाव मिळतो त्याच पद्धतीने रब्बी हंगामातील हरभऱ्याला सद्यःस्थितीत अक्कलकोट तालुक्यातील दुधनीच्या बाजार समितीत हमीभावापेक्षा हजार रुपये जादा दिला गेला आहे.
अर्थात प्रतिक्विंटल ६४०० रुपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वास्तविक रब्बी हंगामातील पिकांना दर हा कमी मिळत असतो.
परंतु दुधनी बाजार समितीत अलीकडच्या काळात सर्व प्रकारच्या पिकांना हमीभावापेक्षा जादा दर मिळत आहे. त्यामुळे कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचा ओढा दुधनीकडे वाढत आहे.
खरीप हंगामातील उडीद व मूग काढल्यानंतर शेतकरी हे रब्बी हंगामातील हरभरा पीक घेतात. केंद्र सरकारकडून हरभऱ्यास ५४४० चा हमीभाव असताना दुधनी मार्केट कमिटीमध्ये मात्र हजार रुपये जादा दर आहे.
हरभरा हा मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली व देशातील इतर राज्यात पाठवून दिला जात असल्याचे मार्केट कमिटीचे सचिव एस.एस. स्वामी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी व्यापारी प्रक्रिया पार पडते. या हंगामात मार्केट कमिटीमध्ये ७००० क्विंटल हरभऱ्याची उलाढाल झाली आहे. इतर पिकांनाही योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - अप्पू परमशेट्टी, सभापती, दुधनी मार्केट
अधिक वाचा: Farmer Id : शेतकऱ्यांना दिले जाणारे फार्मर आयडी कशासाठी? काय होणार त्याचा फायदा? वाचा सविस्तर