भरत निगडे
नीरा : सणासुदीचे दिवस तोंडावर आले आहेत. या काळात हरभरा डाळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते; परंतु मागील आठ दिवसांत हरभऱ्याचे भाव वाढल्याने हरभरा डाळीचेदेखील भाव वाढले.
यामुळे ऐन सणासुदीच्या काळात पुरणपोळी शौकिनांचा हिरमोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज २५ जुलैपासून श्रावणाला सुरुवात होतं असून या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात.
नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पोळा व इतर सणांला पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो; परंतु मागील आठ दिवसांत क्विंटलमागे हरभऱ्याचे भाव ५०० ते ६०० रुपयांनी वाढले आहेत.
९० टक्के शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेपोटी मिळेल त्या दरात हरभरा विकून मोकळे झाले आहेत नंतर मात्र बाजारात हरभऱ्याचे भाव वाढत आहेत. हरभऱ्याच्या दरवाढीचा फायदा मात्र स्टॉकिस्ट व्यापाऱ्यांना होताना दिसत आहे.
श्रावण महिन्यापासून सणावारांना सुरुवात होते. नागपंचमी आणि येऊ घातलेल्या इतर सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. गत आठ दिवसांमध्ये क्विंटलमागे हरभऱ्याचे भात ५०० ते ६०० रुपयांनी वाढले आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी आपले हरभरा विकले आहेत, आता भाव वाढत असल्याने स्टॉकिस्ट व्यापाऱ्यांना लाभ होत असल्याचे दिसून येत आहे. काही मोठ्या शेतकऱ्यांनी हरभरा न विकता घरातच ठेवला आहे. त्यांना या भाववाढीचा चांगलाच फायदा होईल असे दिसते.
सासवड बाजार समितीत असा वाढत गेला भाव
महिना - प्रतिक्विंटल दर
मार्च - ५,११०
मे - ५,८००
जून - ५,३००
जुलै - ५,९५१
सध्या आपल्या भागात हरभऱ्याचे उत्पादन कमी झाले असून मागणी वाढत आहे. ऑस्ट्रेलियाचा हरभरा महाग असल्यामुळे आपल्या भागातील हरभऱ्याचाही भाव वाढू लागला आहे. सध्या डाळ मिलवाल्यांकडून हरभरा ६ हजार २०० रुपये क्विंटलने खरेदी केला जात आहे. येत्या काळात सणासुदीचे दिवस असल्याने हरभऱ्याचे भाव ८ हजार रुपये क्विंटलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. - रूपचंद बापूराव कांदगे, अडत व्यापारी, सासवड
अधिक वाचा: Ranbhajya: पावसाळ्यात रानभाज्यांची जादू; चवीबरोबरच 'या' रानभाज्यांचा आरोग्यालाही मोठा फायदा