सांगली : मकर संक्रांतीनिमित्ताने बाजारपेठेत गुळाची मागणी वाढली आहे. शहरातील बाजार समितीत दररोज सरासरी ५१८ क्विंटलपर्यंत आवक होत आहे.
मंगळवारच्या सौद्यामध्ये सर्वसाधारण दर ३ हजार ७२० ते चार हजार १४० रुपयांपर्यंत मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दरात १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे.
त्यामुळे गूळ उत्पादकांना आणि ग्राहकांनाही गुळाचा गोडवा मिळत आहे. गुळाचा हंगाम हा साधारणतः नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत असतो. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सांगलीचा समावेश आहे.
येथील गुळाला विदर्भ, खान्देश, गुजरातमध्ये मोठी मागणी असते. काही वर्षांपूर्वी येथील बाजार समितीत दररोज जवळपास २५ ते ३० हजार गुळाच्या डागांची आवक होत होती.
मात्र, काही वर्षांपासून गुळवे, कामगारांची कमतरता तसेच साखर कारखाने, गूळ पावडर कारखाने निर्माण झाल्याने जिल्ह्यातील गूळ उत्पादनावर संक्रांत आली मात्र, जिल्ह्यातील काही आहे.
शेतकरी आजही गुळाचे उत्पादन घेतात. ग्राहकांची मागणी जाणून घेऊन त्या पद्धतीने शेतकरी गूळ निर्मिती करीत आहेत.
गूळ पाच हजार क्विंटल
नागरिक आरोग्याला प्राधान्य देत असल्यामुळे सेंद्रिय गुळाला प्रचंड मागणी आहे. पण, सेंद्रिय गुळाची म्हणावी, तेवढी आवक होत नाही. सेंद्रिय गुळाला प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे, अशी माहिती गूळ व्यापारी अजित पाटील यांनी दिली.
महिनाभरापासून आवक सुरू
- महिनाभरापासून बाजार समितीत गुळाची आवक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दरात वाढ झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत आवक कमी आहे. साखर कारखान्यांमुळे गुऱ्हाळांचे प्रमाण कमी आहे.
- मजुरांची कमतरता भासत असल्याने गूळ उत्पादनाकडील कल कमी झाला आहे, अशी प्रतिक्रिया सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी दिली
सांगली मार्केट यार्डामध्ये दररोज जवळपास ५०० ते ७०० क्विंटलपर्यंत गुळाची आवक होत आहे. सध्या जास्तीत जास्त दर चार हजार १४० रुपये, सर्वसाधारण भाव तीन हजार ७२० रुपयांपर्यंत मिळत आहे. मकरसंक्रांतीमुळे गुळाच्या दरात तेजी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बिगर रासायनिक गुळाला मागणी जास्त असून दरही प्रतिक्विंटल चार हजार ते चार हजार ५०० रुपये दर मिळत आहे. अन्य गुळाला ३ हजार ७०० ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. साखर कारखाने वाढल्यामुळे गुऱ्हाळ कमी झाली आहेत. - अजित पाटील, गूळ व्यापारी, सांगली