खानापूर : खानापूर घाटमाथ्यावर देशांतर्गत निर्यात केल्या जाणाऱ्या द्राक्ष काढणीच्या हंगामास सुरुवात झाली असून सुपर सोनाका जातीच्या द्राक्षास चार किलोस ४५० ते ४७० रुपये दर मिळाला आहे.
खानापूर घाटमाथ्यावरील पळशी व हिवरे या परिसरात द्राक्ष बागांचे प्रमाण मोठे आहे. या परिसरातील शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तसेच देशांतर्गत चालणाऱ्या द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात.
यावर्षी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने द्राक्ष बागांमध्ये अनेक दिवस पाणी साचून राहिले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागास द्राक्ष घड न आल्याने हंगाम वाया गेला आहे.
मात्र काही शेतकऱ्यांनी खराब वातावरण असताना सुद्धा धाडसाने आगाप छाटणी घेऊन प्रतिकूल वातावरणामध्ये द्राक्ष बागा जोपासल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात केल्या जाणाऱ्या द्राक्ष बागांच्या काढणी हंगामास अजून सुरुवात झालेली नाही मात्र हिवरे परिसरामध्ये सध्या देशांतर्गत द्राक्ष बागांची द्राक्ष काढणी चालू असून चांगला दर मिळत आहे.
या परिसरात अजून थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तरीसुद्धा द्राक्षास चांगला दर मिळत असल्याने द्राक्षांच्या दरात अजूनही वाढ होण्याची द्राक्ष बागायतदारांना आशा आहे. त्यामुळे यावर्षी ज्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांना द्राक्ष घड आहेत त्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
अधिक वाचा: लाल मिरचीचे भाव वाढले; कोणत्या प्रकारातील लाल मिरचीला मिळतोय सर्वाधिक दर?
