नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंर्तगत मका, बाजरी, ज्वारी खरेदी केंद्र सुरू होणार असून, नावनोंदणी ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, श्री शनैश्वर खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विलास आहेर यांनी दिली.
खरीप हंगाम २०२५-२६ या चालू हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे नांदगाव येथे धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार श्री शनैश्वर नांदगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि., नांदगाव यांची सबएजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून मका, बाजरी व ज्वारी हे धान्य सदर केंद्रावर खरेदी केले जाणार असून त्यापूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक असून, नावनोंदणीची मुदत ३० नोव्हेंबर २५ ही अंतिम राहणार आहे.
या आधारभूत किमतीने होईल मालाची खरेदी
• मका - २४०० रुपये, बाजरी २७७५ रुपये, ज्वारी (संकरित) ३६९९ रुपये (प्रतिक्विंटल) तसेच बायोमेट्रिक ऑनलाइन नोंदणी करणे कामी खातेदार शेतकरी यांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असून, शेतकरी वर्गाने सन २०२५/२६ या वर्षचा खरीप पीक पेरा असलेला ७/१२ व खाते उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, बँकेस लिंक असलेला मोबाइल नंबर, आधारकार्डची झेरॉक्स व बँकेचे खाते हे जनधन खाते नसावे, या सूचना विचारात घेणे आवश्यक आहे.
• तरी नावनोंदणीकरिता श्री शनैश्वर नांदगाव तालुका खरेदी-विक्री सहकारी संघ, नांदगाव याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, उपसभापती अनिल सोनवणे व शनैश्वर खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विलास आहेर, तसेच बाजार समितीच्या संचालक मंडळाने केले आहे.
हेही वाचा : हिवाळ्यात बाजरी खाण्याचे फायदे आणि आरोग्यदायक परिणाम वाचून तुम्हीही होणार थक्क
