पुणे: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीवरील टॅरिफमध्ये दिलेल्या सवलतीमुळे भारतीय तांदूळ निर्यात क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.
भारतावर लागू करण्यात आलेला १८ टक्के टॅरिफ हा पाकिस्तान व थायलंडसारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत कमी असल्याने, जागतिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मक क्षमता अधिक बळकट होणार आहे.
याचा थेट फायदा शेतकरी, व्यापारी आणि संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेला होणार आहे. या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारताच्या तांदूळ निर्यातीत लक्षणीय वाढ होणार आहे, अशी माहिती मार्केट यार्ड येथील तांदूळ निर्यातदार व्यापाऱ्यांनी दिली.
सध्या जागतिक बाजारात भारताचा तांदूळ निर्यातीत सुमारे ४० टक्के वाटा असून, सरकारने दीर्घकालीन व स्थिर निर्यात धोरण स्वीकारल्यास हा वाटा ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
एखाद्या नव्या देशात भारतीय तांदळाचा वापर सुरू झाला की, पुढील वर्षापासून भारतीय तांदळाती निर्यात वाढेल.
या निर्णयाचे स्वागत
◼️ अमेरिकेने भारतासाठी टॅरिफ कमी केल्याने तांदूळ निर्यात क्षेत्राला मोठे बळ मिळाले आहे.
◼️ भारताकडे दर्जेदार तांदूळ, मुबलक साठा आणि सक्षम पुरवठा साखळी आहे.
◼️ सरकारने निर्यात धोरणात सातत्य ठेवले, तर भारतीय तांदळाला जागतिक बाजारात दीर्घकालीन व स्थिर मागणी निर्माण होईल.
◼️ याचा थेट फायदा शेतकरी, व्यापारी आणि कृषी अर्थव्यवस्थेला होणार आहे.
◼️ थायलंड व पाकिस्तानपेक्षा कमी टॅरिफचा फायदा भारतीयांना होणार असल्याने या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारताच्या तांदूळ निर्यातीत लक्षणीय वाढ होणार आहे.
भारताकडे सध्या सुमारे १४९ दशलक्ष मेट्रिक टनांचे विक्रमी तांदूळ उत्पादन व मोठा साठा उपलब्ध असल्याने चालू निर्यात हंगामात निर्यातदारांकडे पुरेसा माल राहणार आहे. मात्र बासमती तांदळाचे सध्याचे उच्च दर आणि डॉलरमधील चढउतार लक्षात घेता दरांवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. परिस्थिती अनुकूल राहिल्यास अमेरिकन बाजारपेठेत भारताला आघाडी घेण्याची मोठी संधी असून, टॅरिफ धोरणामुळे भारताच्या तांदूळ निर्यातीत लक्षणीय वाढ होईल. - राजेद्र बाठिंया, अध्यक्ष, दी पुना मर्चट चेंबर पुणे व तांदूळ व्यापारी
टॅरिफमध्ये दिलेल्या सवलतीमुळे भारतीय तांदूळ निर्यात क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळाले असून, भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारात स्पर्धा करणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचा फायदा थेट शेतकरी, व्यापारी आणि संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेला होणार आहे. मात्र बासमती तांदळाची सध्या उत्पादन कमी असून, मागणी अधिक असल्याने बासमती तांदूळ दरात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. - अभय संचेती, ज्येष्ठ व्यापारी
अधिक वाचा: खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने सोयाबीनला चांगले दिवस येणार; अजून दरवाढ होण्याची शक्यता
