गजानन वाघ
अद्रक (Ginger Crop) या मसालावर्गीय पिकाचे दर बाजारात कमालीचे कोसळल्याने सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी परिसरातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. केलेला खर्चही निघत नसल्याने त्यांच्यासमोर नवे संकट उभे राहिले आहे. (Ginger Crop)
अद्रक या मसालावर्गीय पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. एकरी सरासरी १०० क्विंटल उत्पन्न मिळत असल्याने आणि मागील वर्षी सरासरी १२ ते १५ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाल्याने यावर्षी लिहाखेडी व परिसरातील शेतकऱ्यांनी अद्रकाची बऱ्यापैकी लागवड (Cultivation) केली आहे.
यासाठी १५ ते १८ हजार रुपये प्रति क्विंटल दराने अद्रकाचे बेणे (seeds) विकत घेतले. त्यानंतर शेणखत आणि रासायनिक खत, ठिबक सिंचनावर मोठा खर्च केला. वेळोवेळी महागड्या फवारण्याही केल्या; मात्र प्रचंड खर्च करूनही पिकाला सड लागली.
ही बाब शेतकरी गेल्या ८ दिवसांपासून अद्रक काढत असताना दिसून आली. यात काही शेतकऱ्यांचे पूर्ण पीकच सड लागल्याने वाया गेले तर काहींचे सुमारे ४० टक्के पीक वाया गेले आहे.
उत्पन्नात घट झाली तरी पिकाला चांगला दर मिळेल, असे वाटत असतानाच सोमवारी अद्रकाचे बाजारभाव सुमारे २ हजार १०० ते २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत कोसळल्याने लागवडीसाठी विकत आणलेल्या बेण्याचाही खर्च शेतकऱ्यांना निघाला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
तथापि, अजूनही काही शेतकऱ्यांना अद्रकाचे भाव वाढतील, अशी आशा आहे. काही शेतकऱ्यांनी अद्रक पिकाचे नुकसान भरून काढण्यासाठी ऊस या आंतरपिकाची लागवड केली आहे. मात्र, यातून त्यांना कितपत दिलासा मिळेल, हे सांगणे कठीण आहे.
मागील वर्षी १२ ते १५ हजार रुपये दर
उत्पन्नात घट झाली तरी पिकाला चांगला दर मिळेल, असे वाटत असतानाच सोमवारी अद्रकचे बाजारभाव सुमारे २ हजार १०० ते २ हजार ४०० रु. प्रति क्विंटलपर्यंत कोसळल्याने लागवडीसाठी विकत आणलेल्या बेण्याचाही खर्च शेतकऱ्यांना निघाला नाही.
सडीचे प्रमाण जास्त; उत्पन्नात मोठी घट
मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी अद्रकाच्या रूपाने हातात सोने येईल, असे वाटत होते. मात्र, हातात माती आली. यावर्षी अद्रक सडीचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे उत्पन्नात प्रचंड घट झाली. तसेच बाजारभाव कोसळल्याने यावर्षी अद्रकाचे पीक तोट्यात आहे. - गोरख साखळे, शेतकरी
चालु भाव २,२०० ते २,३०० आहे. मार्केटमध्ये मंदी असून कर्नाटक राज्यातून आवक जास्त वाढल्यामुळे अद्रक पिकाचे भाव घसरले आहेत. आवक वाढल्याने हेच भाव राहू शकतात. - अजमत शेख, व्यापारी
अद्रक पिकाचा एकरी असा येतो खर्च
* बेणे ८ ते १० क्विंटलसाठी १.२० ते दीड लाख रुपये
* शेणखत ४ ट्रॉलीसाठी २० हजार रुपये
* रासायनिक खतासाठी १० हजार रुपये
* लागवड खर्च हजार रुपये
* फवारणी २० हजार रुपये
* विद्राव्य खते व औषधी २५ हजार रुपये
* एकूण खर्च प्रति एकर २ लाख रुपये