सोलापूर : अत्याधुनिक यंत्रसामग्री, मिश्रखते तसेच पाण्याची मुबलकता यामुळे गव्हाचे प्रतिहेक्टर उत्पन्न वाढले आहे. उन्हाळ्याची चाहुल लागताच बाजारात नवा गहू व ज्वारीची आवक वाढू लागली आहे.
सध्या घाऊक बाजारात गव्हाचा कमीत कमी दर २ हजार ६०० रुपये, जास्तीत जास्त ३ हजार ८९० रुपये, तर सर्वसाधारण दर ३ हजार रुपये इतका असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने लोकमतशी बोलताना दिली.
दरम्यान, सोलापुरातील श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ९५३ क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. या गव्हाला ३,६०० ते ३,८०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे.
सध्या नुकताच गहू बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आवक मर्यादित आहे. गव्हाचे दरदेखील काही प्रमाणात चढे असल्याचे पाहायला मिळते.
आगामी काळात गव्हाची आवक वाढल्यानंतर दरामध्ये आणखी घसरण होऊ शकते. त्याचबरोबर चांगल्या गुणवत्तेचा गहू बाजारात येण्यास अवधी आहे.
त्यामुळे जे नागरिक थांबू शकतात, त्यांनी ८ ते १० दिवस गहू खरेदी करण्यासाठी थांबावं. मात्र, ज्यांना घाई आहे ते आतादेखील गव्हाची खरेदी करू शकतात.
पुढील आठवड्यात उत्तम गहू बाजारात
◼️ बाजारात सध्या नुकतीच गव्हाची आवक सुरू झाली आहे. आगामी काळामध्ये आवक वाढण्याबरोबरच दर कमी होऊ शकतो.
◼️ तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी स्वतःपुरत्या गव्हाची पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून गव्हाला फारशी मागणी असणार नाही.
◼️ नोकरदारवर्ग मात्र बाजारातून एप्रिल, मेमध्ये गहू खरेदी करतो. आणखी ८ ते १० दिवसांनी उत्तम गहू बाजारात येण्यास सुरुवात होईल, तेव्हापासून ते मे महिन्यापर्यंत गव्हाची खरेदी केली जाऊ शकते
बाजारामध्ये नवीन गव्हाची आवक येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, सध्या बाजारात येत असलेला गहू हा ओलावा असलेला आहे. त्याचबरोबर त्याची गुणवत्तादेखील कमी आहे. सध्या केवळ २५ टक्के गव्हाची हार्वेस्टिंग झाली आहे. ७५ टक्के गहू हा शेतामध्ये उभा आहे. दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. पुढील आठवड्यात चांगला गहू बाजारात येईल. त्यानंतर खरेदी वाढणार आहे. - सागर तोडकरी, गहू व्यापारी
अधिक वाचा: कर्जमाफी नक्की कशाच्या आधारावर दिली जाणार; शेतकऱ्यांची कोणकोणती माहिती घेतली जाणार?
