राजुरी : स्वयंपाक घरात झणझणीत फोडणीसाठी आवश्यक लसूण थेट ६०० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे वरण फिके होत आहे. बाजारात लसणाची चढ्या दरात विक्री केली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी लसूण ४० रुपये किलो दराने विकला जात होता. आता तो न खाल्लेला बरा अशी परिस्थिती आहे. हायब्रीड लसूणही महागला आहे. तालुक्यातील पूर्वपट्टयात लसूण मोठ्याप्रमाणात लागवड होत होती, पण मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी त्याच्या लागवडीकडे दुर्लक्ष केले.
आता मात्र या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. उत्पादन वाढणे ठीकच, पण पुन्हा भाव कोसळले तर काय ? अशी त्यांच्यात भीती आहे. नवीन लसणाची लागवड फेब्रुवारीत होत असते, हे दर तोपर्यंत कायम राहणार आहेत. हायब्रीड लसणाची आवक बाहेरून प्रदेशातून होते.
गावराण लसून ६०० रुपये किलो असून तो लगतच्या गावातील शेतकऱ्यांकडून गावातील बाजारात दाखल होतो, पण हायब्रीड लसूण मध्य प्रदेशातून येतो. त्याचा दर ४०० ते ५०० रुपये किलो आहे, पण याला गावरान लसणाची चव नाही. लसणाचे दरगगनाला भिडल्याने ग्राहक पावशेर, छटाक खरेदी करतात.
हायब्रीड लसणाला गावराण लसणाची चव नाही
गावरान लसूण ६०० रुपये किलो विकला जात आहे. या लसणाची आवक पंचक्रोशीतून होत आहे; पण हायब्रीड लसणाची आवक थेट मध्य प्रदेशातून होत आहे. ४०० ते ५०० रुपये किलो दराने हा लसूण विकला जात आहे. मात्र, त्यास गावराण लसणाची चव नाही.
लसूण घेण्याकडे ग्राहकांची पाठ
वरण, भाजी, चटणीला लसणाच्या फोडणीशिवाय पर्याय नाही, पण ६०० रुपये दर वाढल्याने विनालसणाचे सपक जेवण करावे लागत आहे.
लसूण महाग का झाला?
■ दोन वर्षांपूर्वी गावरान लसूण ४० रुपये किलो, तर हायब्रीड लसूण २० रुपये किलो विकला जात होता. या मातीमोल भावामुळे लसूण उत्पादक राज्यातील शेतकऱ्यांनी लसणाच्या लागवडीकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे.
■ उत्पादन घटल्याने लसणाचा भाव गगनाला भिडला आहे. भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी लसणाची लागवड करत आहेत; पण जपूनच. कारण जास्त लागवड झाली तर उत्पादन वाढून भाव पुन्हा कोसळेल, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. नवीन लसणाची आवक फेब्रुवारीत सुरू होते. तोपर्यंत भाव टिकून राहील.
हेही वाचा : शाळेतील शेतकऱ्यांची मुलं म्हणताहेत 'आमची भाजी आम्ही पिकवू'