येत्या काही दिवसांत श्रावण, त्यानंतर गणेशोत्सव, पितृ पंधरवडा आणि नंतर नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा अशा सणांची मालिकाच असल्याने फुलबाजारात उत्साह असून फुलांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या व्यवसायाला बहर आला आहे. सध्या देखील फुलांची मागणी वाढल्याने फूल बाजारात तेजी असल्याने फुलांच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत.
चातुर्मासात वेगवेगळे सणवार, उत्सवाबरोबरच धर्मकार्ये केली जातात. त्यानंतर लग्नसराईत देखील फुलांना चांगली मागणी असते. फूल निर्माते शेतकरी, विक्रेते, सजावट करणारी अशा सर्वांनाच सुगीचे दिवस आले आहेत. अवकाळी पावसामुळे फुलांच्या उत्पादनात काहीशी घट झाल्याने त्याचा परिणाम किमतीवर झाला आहे.
नाशिक जिल्ह्याच्या मनमाड फूल बाजारात ग्रामीण भागाबरोबरच नाशिक, निफाड, दिंडोरी, मालेगाव, शिर्डी, गुजरातच्या ग्रामीण भागातून फुले शहरात येतात. गुलाब, मोगरा, शेवंती, चाफा, झेंडू, कमळ, जरबेरा, निशिगंध, धोत्र्याची फुले यांना या काळात चांगली मागणी असते.
अस्टर व धोत्र्याची फुले यांना या काळात चांगली मागणी असते. फूल उत्पादन करणाऱ्या भागात अवकाळी पाऊस पडल्याने फुलांच्या उत्पादनात मोठी घट झाली असून दर्जेदार कोरड्या फुलांना चढ्या भावाने खरेदी करावे लागत आहे.
गुलाब ८० रुपयांवर
काही दिवसांपूर्वी पन्नास रुपये डझन असलेला गुलाब ८० रुपयांवर गेला असून आगामी काळात दर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. यापेक्षा अधिक आहे. मोगऱ्याचे दर देखील वाढले आहेत.
मोगरा, शेवंतीसह सुगंधी फुलांचे भाव वाढले
• झेंडूचा दर जवळपास २०० रुपये प्रति किलो, मोगरा ८०० रुपये प्रति किलो, शेवंती ३०० रुपये प्रति किलो तर अस्टर ४०० रुपये, निशिगंध ४०० रुपये किलो, सोनचाफा व धोतरा १२ रुपये प्रति नग असा दर आहे.
• सुमन शर्मा या गृहिणी म्हणाल्या, फुलांची दरवाढ झाली तरी फुलांशिवाय गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी, जन्माष्टमी व इतर सण साजरे करणे अशक्य आहे.
• आगामी काळात मोठ्या प्रमाणात ३ सण-उत्सव असल्याने फुलांचे वाढलेले दर कमी होण्याची शक्यता नाही. झेंडू, मोगरा आणि गुलाबाला मागणी असल्याचे फूल विक्रेते देविदास निते यांनी सांगितले.