खरीप हंगामातील शासकीय धान खरेदीकरिता शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला सुरुवातीला १२ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. ते उद्दिष्ट मंगळवारी पूर्ण झाले.
मात्र नोंदणी केलेले ८० हजार शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत असल्याने शासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट ६ लाख क्विंटलने वाढवून दिले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी करते.
शासनाने यंदा धानाला २३६९ प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असून, खरिपातील धान खरेदी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या एकूण १८३ धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली असून, १७३ धान खरेदी केंद्रावरून प्रत्यक्षात धान खरेदी सुरू आहे.
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी बीम पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील १ लाख २० हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, तर आतापर्यंत एकूण ३५ हजार शेतकऱ्यांनी १३ लाख ५० हजार क्विंटल धानाची विक्री केली आहे.
शासनाने बुधवारी (दि.२४) मार्केटिंग फेडरेशनला धान खरेदीचे उद्दिष्ट ६ लाख क्विंटलने वाढवून दिले. त्यामुळे खरिपातील धान खरेदीचे एकूण उद्दिष्ट हे १८ लाख ५० हजार क्विंटल झाले आहे. उद्दिष्ट वाढवून दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
२९० कोटी रुपयांची धान खरेदी
शासनाने आतापर्यंत ३५ हजार शेतकऱ्यांकडून २३६९ रुपये प्रति क्विंटल हमीभावाने १३ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या एकूण धानाची किमत २९० कोटी रुपये असून, धानाची विक्री करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांचे चुकारे थकले आहे. त्यामुळे शासनाने चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
