न्हावी, आमोदा, फैजपूर आणि बामणोद परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीविरोधात बुधवारी आंदोलन छेडले.
मधुकर सहकारी साखर कारखान्याजवळ रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर केळी फेकून संताप व्यक्त केला आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच बहऱ्हाणपूर केळी बोर्ड बंद करण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांनी केळीला योग्य दर मिळावा आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीला आळा घालावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रावेर केळी बोर्डाचा अधिकृत दर १४०० ते १५५० रुपये असताना प्रत्यक्षात केळीची खरेदी अवघ्या ५०० रुपयांपर्यंत होत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
केळीला बोर्डानुसारच भाव मिळाला पाहिजे", "रावेर केळी बोर्डाचा दर सक्तीने लागू करावा" आणि व्यापाऱ्यांनी ठरलेल्या दरानुसारच खरेदी करावी" अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच बहऱ्हाणपूर केळी बोर्ड बंद करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली.
खतांचे दर कमी करा
• शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी अडचणीत सापडत असल्याने खतांचे दर कमी करावेत, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
• जिल्हाधिकारी घटनास्थळी येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. या आंदोलनाला माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.
• दरम्यान, रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस प्रशासनाने घटनास्थळी शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
हेही वाचा : हवामान बदल आणि शेती पुढील आव्हाने; जाणून घ्या यावरील शाश्वत उपाय
