दीपक दुपारगुडे
सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच खरबूज उत्पादनाला वेग येतो. गोडसर, रसाळ आणि शरीराला थंडावा देणारं हे फळ. पण याच गोड फळाच्या मागे असलेलं एक कटु वास्तव आज समोर आलं आहे.
शेतकरी थेट रस्त्यावर येऊन आपलं फळ विकताना दिसत आहेत. गावरान खरबुजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा दर कोसळल्याचा फटका बसला आहे.
गावरान खरबुजापेक्षा हायब्रिड खरबूजची आवक जास्त, दर कमी आहेत. नफा तर दूरच; पण उत्पादन खर्चही भरून निघत नाही, परिणामी उत्पादक रस्त्यावर विक्रीस उतरले आहेत.
अधिक उत्पादन, मागणीतील घट आणि व्यापाऱ्यांकडून खरेदी कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना थेट रस्त्यावर उतरून आपला माल ग्राहकांना विकावा लागत आहे.
पुळूज, तिहे, टाकळी, वडकबाळ, हिप्परगा, उळे, कुंभारी परिसरातील शेतकरी शहरातील अक्कलकोट रोड, तुळजापूर रोड, पुणे रोड, कंबर, तलाव, विजयपूर रोड, होटगी रोड, देगांव रोड, भैय्या चौक परिसरात खरबूज विक्रीला सुरुवात केली आहे.
देशी जवारी खरबूजला ग्राहकांची अधिक पसंती असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. हे खरबूज राम नवमी, हनुमान जयंतीला खास देवाला अर्पण करण्याकडे भक्तांचा कल असतो.
खरबूज हे फळ शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करते, पचन सुधारते, त्वचेसाठी फायदेशीर ठरते. विशेषतः उन्हाळ्यात या फळाची मागणी असते. तरीही याचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
शासनाने त्वरित लक्ष घालून हमीभाव जाहीर करावा, बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीला लगाम घालावा आणि खरबूज विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
रस्त्यावर विक्रीमागील कारणे
● बाजारपेठांमध्ये खरबुजाची आवक अचानक वाढल्याने दर कोसळले. व्यापाऱ्यांकडून कमीत कमी दराने खरेदी केली जात असल्याने शेतकरी नाराज.
● खरबूज जलयुक्त असल्यामुळे साठवणूक शक्य नाही, त्यामुळे माल पटकन विकणे आवश्यक. शासकीय खरेदी यंत्रणा नाहीत, ना हमीभाव.
व्यापाऱ्यांना कमी किमतीत माल विकून आम्हाला केवळ नुकसानच होते. म्हणून आम्ही ग्राहकांपर्यंत थेट पोहोचून तरी थोडा दिलासा मिळवायचा प्रयत्न करत आहोत. खरबूज विक्रीसाठी शहरात आल्याने शेतीची कामे मात्र तसेच राहत आहेत. किमान दर मिळावा ही अपेक्षा. - शंकर जाधव, शेतकरी, तेलगाव.
चांगला दर मिळेल म्हणून अडीच महिन्यापूर्वी २० गुंठ्यात खरबूज लागवड केली. यार्डात चांगला दर मिळाला नाही म्हणून स्वतः शहरात विक्री करतोय, म्हणून किमान उत्पादन खर्च निघाला. - सुभाष मल्लाव, शेतकरी, तिन्हे.