Lokmat Agro >बाजारहाट > घसरत्या कांदा दरामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर फिरले पाणी; शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात

घसरत्या कांदा दरामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर फिरले पाणी; शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात

Falling onion prices have ruined farmers' dreams; Farmers' future in darkness | घसरत्या कांदा दरामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर फिरले पाणी; शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात

घसरत्या कांदा दरामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर फिरले पाणी; शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात

निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानामुळे शेतकरी भाजीपाला, फळबाग आणि दुग्धव्यवसायाकडे वळले. तर अनेकांनी कांदा लागवडीवर भर दिला; परंतु कांद्याला मिळणारा मातीमोल भाव आणि साठवणुकीतील नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानामुळे शेतकरी भाजीपाला, फळबाग आणि दुग्धव्यवसायाकडे वळले. तर अनेकांनी कांदा लागवडीवर भर दिला; परंतु कांद्याला मिळणारा मातीमोल भाव आणि साठवणुकीतील नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानामुळे शेतकरी भाजीपाला, फळबाग आणि दुग्धव्यवसायाकडे वळले.

तत्काळ रोख रक्कम मिळेल, या आशेने अनेकांनी कांदा लागवडीवर भर दिला; परंतु कांद्याला मिळणारा मातीमोल भाव आणि साठवणुकीतील नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात गेल्या चार वर्षापासून निसर्गाचा उद्रेक आणि बाजारातील अस्थिरता यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कांद्याच्या घसरत्या भावाचा फटका

यंदा कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी मेहनतीने पीक घेतले. खुरपणी, खत, पाणी यासाठी मोठा खर्च केला. कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल, मुलांचे शिक्षण आणि संसाराचा खर्च भागेल, अशी आशा होती.

मात्र, बाजारात कांद्याचे भाव ८ ते १४ रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरले. साठवणुकीसाठी चाळीत ठेवलेला कांदा आता वातावरणातील बदलांमुळे सडू लागला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना नाइलाजास्तव कमी भावात कांदा विकावा लागत आहे. यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.

बाजारातील अनिश्चितता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न

बाजारातील भाव कधी वाढतील, याचा अंदाज बांधणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. "शेतात माल असताना भाव तेजीत असतात; पण विक्रीसाठी बाजारात गेल्यावर भाव पडतात. यात कोणाला दोष द्यायचा?" अशी उद्विग्न भावना शेतकरी रमेश काळे यांनी व्यक्त केली. सततच्या वातावरण बदलामुळे चाळीत साठवलेला कांदा नासतो आहे. पावसाळ्यात कांद्याची अवस्था बिकट झाली असून, शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

"आम्ही ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतात राबतो. मेहनतीने कांदा पिकवतो; पण जेव्हा बाजारात माल नेताना भाव कोसळतात, तेव्हा सगळी मेहनत मातीमोल होते," अशी खंत ओतूर येथील शेतकरी संजय पवार यांनी व्यक्त केली.

गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव सतत घसरत आहेत. साठवलेला कांदा सडत असल्याने शेतकऱ्यांना तो कवडीमोल भावात विकण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत.

शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात

कांद्याच्या भावातील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक भवितव्य अंधारात आहे. "आम्ही घाम गाळतो, नैसर्गिक संकटांना तोंड देतो; पण शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. मग शेतकऱ्याने जगायचे कसे?" अशी विचारणा शेतकरी सूर्यकांत जाधव यांनी केली. कांद्याच्या भावात सुधारणा होईल, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत त्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे.

उपाययोजनांची गरज

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकार आणि बाजार समित्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कांद्याला हमीभाव, साठवणुकीसाठी आधुनिक सुविधा आणि बाजारातील अस्थिरता कमी करण्यासाठी ठोस धोरणे राबवणे आवश्यक आहे.

हेही वाचा : हमालांचे अचानक वाराईची भाववाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन; शेतकऱ्यांनी विरोध केल्याने कांदा लिलाव बंद

Web Title: Falling onion prices have ruined farmers' dreams; Farmers' future in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.