इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM ) ही संपूर्ण भारतातील इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टल म्हणून तयार करण्यात आले आहे. जी कृषी मालासाठी एकसंध राष्ट्रीय बाजारपेठ तयार करण्यासाठी विद्यमान बाजार समित्या (APMC) आणि इतर मार्केट यार्डांचे नेटवर्क (market yards network) तयार करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आपला शेतमाल या माध्यमातून विक्री करता येऊ शकतो.
बुलढाणा जिल्ह्यातील १३ पैकी ७ बाजार समित्यांमध्ये आता ई-नाम योजना (e-NAM Yojana) कार्यान्वित झाली आहे. यात मलकापूर, खामगाव, शेगाव आणि नांदुऱ्यानंतर आता मेहकर, चिखली आणि लोणार बाजार समित्यांचाही (APMC) या योजनेत समावेश झाला आहे.
यंदाचे वर्ष 'आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष' (Year of International Cooperation) म्हणून साजरे केले जात आहे. सहकारी आणि पणन संस्थांच्या बळकटीकरणावर आणि विकासावर भर देण्यात येत आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यातील बाजार समित्यांची पाहणी केल्यावर ही माहिती समोर आली.
या सात बाजार समित्यांमधून २०१७ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत ई- नाम योजनेअंतर्गत ३४.९९ लाख क्विंटल धान्याची विक्री झाली असून त्यातून १,३६३.९७ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.
आता टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील उर्वरित बाजार समित्यांमध्येही ही योजना विस्तारली जाणार आहे.
राष्ट्रीय कृषी बाजार (ई- नाम) योजना (scheme) १४ एप्रिल २०१६ रोजी सुरू करण्यात आली होती. शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी केंद्र सरकारने ही योजना कार्यान्वित केली.
मेहकर, लोणार बाजार समित्यांचा नव्याने समावेश झाला असून गेल्या सात वर्षांत १,३६४ कोटींची उलाढाल या माध्यमातून झाली आहे.
बाजार समित्यांची विक्री
चिखली | ७६.९५ कोटी |
खामगाव | ३९८.२७ कोटी |
लोणार | ८.३३ कोटी |
मलकापूर | ८३४.६२ कोटी |
मेहकर | ०.१६ लाख |
नांदुरा | ०.७३ लाख |
शेगाव | ४५.७ कोटी |
३५ लाख क्विंटल शेतमालाची खरेदी
सात बाजार समित्यांमध्ये एकूण ७ वर्षामध्ये ३५ लाख क्विंटल शेतमालाची खरेदी ई-नाम योजनेअंतर्गत करण्यात आली.
ई-नाम योजनेचे फायदे
* शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.
* शेतमालाचा ई-लिलाव होतो, त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्याला चांगला दर मिळतो.
* विक्री केल्यानंतर २४ तासांपासून दोन दिवसांच्या आत थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतात.
बाजार समित्यांमध्येही लवकरच होणार सुरू
यंदाचे वर्ष हे 'आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष' म्हणून साजरे केल्या जात आहे. त्या पार्श्वभुमीवर सहकार क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर मोठा भर देण्यात येत आहे. त्यातंर्गत बुलढाणा जिल्ह्यातही आता सहकार क्षेत्रात सुधारणांचे वारे वाहात आहे. शेतकरीही आता या बदलांशी सुसंगत होत असल्याचे जिल्ह्यातील एकंदरीत चित्र आहे.
सात वर्षांत ३१ हजार शेतकऱ्यांना लाभ
* मागील सात वर्षात जिल्ह्यातील ३१ हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मलकापूर, खामगाव आणि शेगाव या बाजार समित्यांमधील ५०७ अडते आणि ४८० व्यापाऱ्यांनी ई-नाम योजनेअंतर्गत ई-लिलावात सहभाग घेतला आहे.
* परिणामी, जिल्ह्यात ई-नाम योजनेचा विस्तार वाढत असून, निम्म्या बाजार समित्यांमध्ये ई-लिलाव ते ई-पेमेंटपर्यंतची प्रक्रिया सुरू झाली आहे.
आर्थिक उलाढालीचा वाढता वेग
जिल्ह्यातील बाजार समित्यांचे वार्षिक आर्थिक व्यवहार ७ हजार कोटींपेक्षा अधिक आहेत. जर ई-नामची सुविधा सर्व १३ बाजार समित्यांत कार्यान्वित झाली, तर बाजारात स्पर्धा वाढून आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढेल. ई-नाम योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यांनी या योजनेत नोंदणी करून त्याचा लाभ घ्यावा. - डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी, बुलढाणा