केंद्र सरकारने २२ सप्टेंबरपासून विविध वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याने बाजारात काही प्रमाणात स्वस्ताई दिसत आहे. ड्रायफ्रूटवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांपर्यंत खाली आणल्याने दर कमी झाले आहेत.
वस्तूनिहाय दरामागे सरासरी १५ पासून ११० रुपयांपर्यंत फरक राहणार आहे. आरोग्यासाठी सुकामेवा व त्यापासून बनवलेले पदार्थ पौष्टिक असतात.
मात्र, सुक्या मेव्याचे दर अधिक असल्याने सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतात. आता जीएसटी ७ टक्क्यांनी कमी केल्याने खजूर, काजू, बदाम, पिस्ता, मनुके, अंजीर, आक्रोड, जर्दाळू, आदी सुकामेवा स्वस्त झाला आहे.
दसरा-दिवाळी आणखी गोड
दसरा व दिवाळीत सुक्यामेव्याचा वापर वाढतो. मिठाईच्या माध्यमातून प्रत्येकाच्च्या घरी सुकामेवा जातो. दरात थोडी कपात झाल्याने यंदा दसरा, दिवाळीची मिठाई आणखी गोड होणार आहे.
सुकामेव्याचे दर (प्रतिकिलो रुपये)
पिस्ता - १५०० ते १७००
मगज बीज - १४०० ते १५००
आक्रोड - १०५० ते १७००
अंजीर - ६५० ते ८००
काजू - ९०० ते १८००
बदाम - ५५० ते ८००
मनुके - ३७५ ते ४१०
खारीक - २०० ते २५०
खजूर - १०५ ते ५५०
मेवा खाण्याचे फायदे
१) रोगप्रतिकारशक्ती वाढवते
सुक्या मेव्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक रोग प्रतिकार शक्ती वाढवून व्हायरल आणि फ्लूपासून बचाव करतात.
२) ऊर्जा आणि ताकद देते
हिवाळ्यात शरीराला अधिक ऊर्जेची गरज असते. सुकामेवा ऊर्जा आणि ताकद टिकवते.
३) हाडे मजबूत करते
काजू आणि बदाममध्ये कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते.
४) पचनक्रिया सुधारते
मनुका यांसारखे सुकामेवा पचनास मदत करतात. त्यांना भिजवून खाल्ल्याने फायटिक अॅसिड कमी होते.
५) हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारते
बदाम, अक्रोड आणि खजूर यांसारखे सुकामेवा हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारतात.
अधिक वाचा: भूमी अभिलेख विभागातील भू-करमापकांच्या ९०३ जागांसाठी भरती; कुठे किती जागा? कसा कराल अर्ज?