थंडीची चाहूल लागल्याने पुणे मार्केटयार्ड बाजारात मोठ्या प्रमाणात बाजरीला मागणी वाढली आहे. बाजरी ही उष्ण असल्याने थंडीत आवर्जून खाल्ली जाते. तर ऊसतोड कामगारांकडून बाजरीला मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या बाजरी बरोबर ज्वारीला मागणी वाढत आहे. यंदा सततच्या पावसामुळे बाजरी आणि ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत बाजरीच्या दरात किलो मागे ५ ते ७ रुपयांचा फरक पडत आहे. बाजरी, ज्वारीचे दर क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी वाढले आहेत. तर प्रतिकिलो ५ ते ७ रुपयांनी वाढ झाली आहे. यंदा दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
महाराष्ट्र, राजस्थानात झालेल्या अवेळी पावसामुळे बाजरीच्या प्रतवारीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे बाजारात चांगल्या प्रतीचे मालाची आवक केवळ ३० टक्के तर हलक्या व काळपड मालाचे प्रमाण ७० टक्के असल्याने बाजारात चांगल्या मालाला अधिक मागणी आहे. सध्या मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज ५० ते ६० टन बाजरी आणि ज्वारी होत आहे.
याप्रमाणे आहेत बाजार दर
| प्रकार | मागील वर्षाचे दर | सध्याचे दर |
| बाजरी | २७ ते ३५ | ३२ ते ४२ |
| ज्वारी गावरान | ३५ ते ५० | ४२ ते ६३ |
| लोकवन गहू | ३५ ते ४५ | ३८ ते ४८ |
बाजरीला थंडीमुळे मागणी वाढली
बाजरी हे एक उष्ण धान्य मानले जाते. थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराला उबदारपणा मिळतो आणि थंडीचा प्रभाव कमी होतो. हे एक नैसर्गिक उपाय आहे.
त्याचबरोबर बाजरी मध्ये पौष्टिक मूल्ये आणि प्रतिकारशक्ती असे अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. जे थंडीत शरीरासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. यामुळे पचनक्रिया मजबूत राहते आणि पोट दीर्घकाळ भरलेले वाटते. त्यामुळे थंडीच्या दिवसात बाजरी मागणी अधिक असते.
यंदाच्या सततच्या पावसाने जवळपास सर्वच पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे धान्याचे भाव नैसर्गिकरीत्याच वाढले आहेत. दिवाळीनंतर थंडी वाढताच बाजरीची मागणी वाढली आहे. यामध्ये आवक कमी होत असून ग्राहकांकडून मागणी वाढली असती तरी चांगल्या प्रतीचा माल कमी असल्याने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारी व बाजरीच्या दरात क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी वाढले आहेत. त्याचबरोबर गहूचे मार्केट टिकून असून दरात २ रुपयांनी वाढ झाली आहे. - अभय संचेती, ज्येष्ठ व्यापारी मार्केटयार्ड.
