गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदीस प्रारंभ झाला. ज्यात धरणगाव (जि. जळगाव) येथे पहिल्याच दिवशी कापसाला ७६५३ तर करमाड (ता. पारोळा) येथे ७४०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.
मराठवाड्यात प्रामुख्याने विजयादशमी (दसरा) या दिवशी खरेदीस प्रारंभ होतो. तर विदर्भात देखील याच दरम्यान खरेदी सुरू होते. मात्र यंदा मान्सुमचे वेळेत आगमन झाले. कापूस लागवडी वेळेत पूर्ण झाल्या तसेच पावसाचा मोठा खंड न पडल्याने पिकांची वाढ जोमाने झाली परिणामी यंदा लवकर कापूस बाजारात दाखल होतो आहे.
धरणगावात श्रीजी जिनिंग येथे काटा पूजन खासदार स्मिता वाघ, दिलीप पाटील, बाळासाहेब चौधरी, जि.प.चे माजी सभापती पी.सी. पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जि.प.चे माजी सदस्य प्रताप पाटील, पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच रत्नापिंप्री, करमाड खुर्द (ता. पारोळा) येथे बाजार समिती संचालक जिभाऊ पाटील यांनी काटा पूजन केले. शेतकरी प्रवीण जुलाल पाटील, अशोक मल्हारी पाटील व रमेश भगवान पाटील या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला. त्याला ७४०० रुपयांचा भाव मिळाला.
यावेळी सरपंच बंडू भिल, माजी सरपंच धर्मराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, अनिल पाटील, रामकृष्ण पाटील, चुडामण पाटील, रामकृष्ण पाटील, भरत पाटील, लोटन पाटील, देवीदास पाटील, भारत पाटील, निंबा पाटील, वसंत पाटील, विष्णू पाटील, परमेश्वर पाटील, मनोज पाटील, जयेश पाटील आदी उपस्थित होते.
कापसाची आवक कमी
दरवर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्ताला अनेक शेतकरी वाहने अथवा बैलगाडीतून कापूस विक्रीसाठी आणत असतात. यंदाच्या हंगामात सुरुवातीला पावसाने सुमारे दीड महिने ताण दिला. त्याचा परिणाम कापसाचे उत्पन्न कमी होण्यावर झाला आहे. आता पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्याचाही फटका कापसाला बसला आहे. त्यामुळे यावर्षी कापसाचे आवक कमी असल्याचे दिसून आले.