सेलू (जि. परभणी) शहरातील बाजार समितीच्या कापूस यार्डात सीसीआयकडून १३ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी केली जात असून एका महिन्यात नऊ कापूस जिनिंग व प्रेसिंगवर १ लाख १० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. भाववाढीची अपेक्षा फोल ठरल्याने शेतकऱ्यांकडून कापूस विक्री केला जात आहे. दरम्यान, आगामी काळात कापसाची आवक वाढणार असल्याचे चित्र आहे.
यंदा मान्सून वेळेवर दाखल झाल्यानंतर जून अखेरपर्यंत खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग व उडीद आदी पिकांची लागवड पूर्ण करण्यात आली होती. तालुक्यात सिंचन क्षेत्र खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन ही दोन पिकांच्या उत्पन्नावर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक भिस्त आहे. शहरात कापूस जिनिंग प्रेसिंगची संख्या अधिक आहे.
तसेच कापसावर आधारित उद्योग आहेत. त्यामुळे दरवर्षी बाजार समिती व खासगी बाजारपेठेत लाखो क्विंटल कापसाची खरेदी केली जाते. तसेच इतर जिल्ह्यातून कापसाची मोठ्या प्रमाणावर सेलूत आवक होते. यावर्षी खरीप हंगामात सर्वाधिक ३३ हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती.
महागडी बियाणे, खत, औषधी खरेदी करून शेतकऱ्यांनी मेहनत घेतली होती. जून व जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर खरिपातील पिके बहरात असतानाच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सलग दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने कापूस पिकांचे नुकसान झाले होते.
मुसळधार पावसामुळे अनेक दिवस शेतात पाणी साचून पिके पिवळी पडली होती. कापसाचा दोन वेचणीतच झाडा झाला होता. खाजगी बाजारात मागील तीन वर्षांपासून कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाने सीसीआयकडून ७,५२१ क्विंटल हमी भावाने कापूस खरेदी सुरू केली आहे. मात्र, कापसाच्या प्रतवारीवर भाव दिल्या जात आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांचा खरिपाचा खर्चही निघणे अवघड झाले आहे.
कापूस विक्रीसाठी वाहनांच्या रांगा
■ शहरातील ९ कापूस प्रेसिंग जिनिगवर सीसीआय १३ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी केली जात आहे.
■ कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. काही शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या आशेवर अनेक महिन्यांपासून घरात कापूस ठेवला होता.
■ मात्र, अनेक महिने प्रतीक्षा करूनही भाव मिळत नसल्याने शेतकरी सीसीआयकडे हमीभावाने कापूस विक्री करताना दिसत आहेत.