विविध कारणांमुळे यंदा सर्वत्र कापसाचे एकरी उत्पादन कमी झाले आहे. त्यातच मजुरी व लागवडीच्या खर्चात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
राज्यात नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वाशिम जिल्ह्यात प्रामुख्याने कारंजा, मानोरा, रिसोड, मंगरूळपीर तालुक्यात कापसाचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही अस्मानी-सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झाले होते.
कापसाच्या उत्पादनात घट झाली. उत्पादन कमी असल्याने कापसाच्या दरवाढीची अपेक्षा होती. मात्र, यंदा शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला प्रति क्विंटल सात हजारांच्या आसपास दर मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रासायनिक खते, किटकनाशक, मशागतीचा खर्च व मजुरीचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्या तुलनेत शेतमालाचे भाव वाढले नाहीत.
कापूस घरातच !
लागवडीचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कापसाला समाधानकारक भाव नाही. भाववाढीच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे.
कापसाचे दर का पडलेत?
• कापसाचे दर आंतरराष्ट्रीय घडामोडींशी जोडलेले असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या कापसाला सात हजारांच्या आसपास दर आहेत.
• कापसाला स्पर्धा करणारा कृत्रिम धागा स्वस्त आहे, या कारणांमुळे कापसाचे दर 'जैसे थे' असल्याचे व्यापारी सांगतात.
• आणखी काही दिवस कापसाचे दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांमधून वर्तविला जात आहे.
७००० रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर !
• कापूस नगदी पीक असले तरी इतर पिकांपेक्षा कापसावर जास्त खर्च होतो. २०२२ मध्ये प्रतिक्विंटल ९ हजारांपेक्षा अधिक दर मिळाला होता.
• मार्च २०२३ मध्ये ८१०० ते ८७०० रुपये दर होता. ऑक्टोबर २०२३ पासून कापसाच्या दरात फारशी वाढ नाही.
• सध्या सरासरी ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.
कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. कापूस पिकावर होणारा खर्च अधिक असल्याने कमी दरात विकणे परवडत नाही. त्यामुळे कापसाच्या दरवाढीची अपेक्षा आहे. लागवड खर्चावर आधारित शेतमालाला हमीभाव असायला हवेत. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा होणार नाही. - महादेवराव सोळंके, शेतकरी, नागठाणा, ता. जि. वाशिम.