नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. काही भागांत कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिके खराब झाली होती.
आधीच हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटलेले आहे. यातच सीसीआयचे नंदुरबार आणि शहादा येथील केंद्र बंद असल्याने जिल्ह्याचा कापूस खेतिया (मध्यप्रदेश) येथे विक्रीसाठी रवाना होत आहे.
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी या हंगामाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, पावसाने वेळोवेळी दिलेला खंड, त्यानंतर काही भागांतील अतीवृष्टी, पुन्हा ढगाळ हवामान यामुळे कापूस पिकाची गुणवत्ता घटली होती.
यात भरीस भर म्हणून जिल्ह्यात बहुतांश भागात कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. यामुळे उत्पादनात घट झाली आहे.
'सीसीआय'ची केंद्रे बंदच
• नंदुरबार जिल्ह्यात शहादा आणि नंदुरबार या दोन ठिकाणी सीसीआयची केंद्रे आहेत. ही दोन्ही केंद्रे दिवाळीनंतर सुरु होणार आहेत. तोवर बहुतांश शेतकरी खेतिया (मध्य प्रदेश) येथील बाजारात कापूस विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे.
• या ठिकाणी व्यापारी कापसाला प्रतिक्विंटल कमीत कमी ६ हजार २०० ते जास्तीत जास्त ७ हजार ६३५ रुपयांचा दर मिळत आहे.
• पैसेही रोख मिळत असल्याने शेतकरी येथे हजेरी देत आहेत. शहादा मार्गाने खेतियाकडे कापूस घेऊन जाणारे शेतकरी सध्या नजरेस पडत आहे. सीसीआयने प्रतिक्विंटल ७ हजार ७१० रुपयांचा हमीभाव केंद्रीय स्तरावरून जाहीर केला असला, तरी खरेदी केंद्र प्रत्यक्षात सुरू होण्यास नोव्हेंबर अखेर उजाडणार आहे.
• यामुळे शेतकरी खासगी विक्रेते किंवा लगतच्या मध्य प्रदेशातील खेतिया बाजारात कापूस विक्री करत आहेत.