वाशिम : कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे भरपूर प्रमाण असलेल्या 'चिया'च्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. याला आता पुण्यात मार्केट उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या सोयीचे झाले आहे.
'चिया'च्या उत्पादनाकडे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, चालू वर्षी जिल्ह्यातील तीन शेतकरी गटांनी त्यांच्या २६१ क्विंटल 'चिया' ची पुणे येथे विक्री केली. प्रतिक्विंटल १३ हजार ५०० रुपयांप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना त्याची ३५ लाखांवर रक्कम मिळाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
रब्बी हंगामातील गहू, हरभरासह अन्य पिकांच्या तुलनेत 'चिया'चा एकरी उत्पादनाचा 'ॲव्हरेज' अधिक असून या पिकाला वन्यप्राण्यांचाही त्रास नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी चिया उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
मागील वर्षी ८९८ हेक्टरवर चिया पिकाची लागवड झाली होती; तर यंदा क्षेत्र वाढून हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड झाली आहे.
दरम्यान योगऋषी जैविक शेती मिशन फार्मन प्रोड्यूसर कंपनी, शिवसूत्र जैविक शेत मिशन फार्मर प्रोड्यूसर कंपनी आणि योगायोग जैविक शेती मिशन फार्मच प्रोड्यूसर कंपनीशी जुळलेल्या रिसोड मालेगाव व वाशिम येथील १६८ शेतकऱ्यांनी मागील वर्षी उत्पादित २६० क्विंटल 'चिया' ची समृद्धी फार्म, पुणे यांना १३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री केली. त्यातून संबंधित शेतकऱ्यांना ३५ लाख ३८० हजारांची रक्कम मिळाली.