यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र घटले असतानाच परतीचा पावसामुळे कापूस उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. 'सीसीआय' मार्फत कापूस खरेदी सुरू झाली असली तरी जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यांत फक्त ४३ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. यात सर्वात जास्त खरेदीत बोदवड, तर मुक्ताईनगरला सर्वात कमी खरेदी झाली आहे.
केंद्र सरकारने यंदा कापसाच्या हमीभावात वाढ करून लांब धाग्याच्या कापसाला ८०१० रुपये आणि कमी धाग्याच्या कापसाला ७७०० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला. मात्र, या वाढीचा प्रत्यक्ष फायदा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
कृषी विभागाच्या प्राथमिक जिल्ह्यातील अंदाजानुसार शेतकऱ्यांकडून 'सीसीआय' मार्फत एकरी फक्त ५ क्विंटल २० किलो, तर हेक्टरी १३ क्विंटल एवढीच खरेदी होत आहे. 'पांढऱ्या सोन्याचा जिल्हा' म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यात यावर्षी कापूस खरेदी कमी झाली आहे.
गेल्यावर्षी फक्त बोदवड तालुक्यात ५० हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी झाली होती. मात्र, यंदा १० डिसेंबरपर्यंत केवळ २० हजार क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. इतर तालुके तर अधिकच अडचणीत आहेत. 'सीसीआय'च्या खरेदीवरील कडक अटी आणि मर्यादांमुळे अनेक शेतकरी शासकीय खरेदीकडे वळत नसल्याचे चित्र आहे.
जळगाव जिल्ह्यातील तालुकानिहाय खरेदी
बोदवड : २० हजार क्विंटल
जामनेर : ११ हजार क्विंटल
भुसावळ : ९ हजार क्विंटल
मुक्ताईनगर : ३,१०० क्विंटल
'सीसीआय'ने एकरी खरेदीची मर्यादा ५ क्विंटलवरून किमान ७ क्विंटल करावी. शेतकऱ्याला एकरी सहा क्विंटल उत्पादन होत असताना तो उरलेला कापूस कुठे विकणार? मर्यादा वाढली, तर शेतकरी 'सीसीआय'कडे वळतील. - अनूपसिंग हजारी, जिनिंग उद्योजक, बोदवड जि. जळगाव.
