सातारा जिल्ह्याच्या कराड शहरात तालुक्यातील अनेक गावांतून मोठ्या संख्येने भाजी विक्रीसाठी शेतकरी येत असतात. दरम्यान, सध्या थंडी पडली असली तरी गाजरांचे उत्पादन चांगले झाले आहे. गुरुवारी पार पडलेल्या बाजारात गाजरांची चांगल्या प्रकारे आवक झाली. बाजारात शंभर रुपये किलोप्रमाणे गाजरांची विक्री झाली.
कराड बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये गाजरांची मोठी उलाढाल झाली असून, हिवाळ्यात गाजरांचा हंगाम सुरू होतो. तो जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांपर्यंत चालतो. मकरसंक्रांती सणावेळी वसा घेण्यासाठी गाजर, ओला हरभरा, ऊस यांचा वापर होत असल्याने या काळात गाजरांची मोठी उलाढाल होत असते.
रविवारी आणि गुरुवारी कराड शहरात भरलेल्या आठवडी बाजारात गाजरांची मोठी आवक पाहायला मिळाली. किरकोळ बाजारभावाप्रमाणे शंभर रुपये किलोप्रमाणे त्याची विक्री झाली. हे दर मकरसंक्रांतीपर्यंत कायम राहतील, अशी माहिती शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आली.
गाजर हे बिटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, के आणि पोटॅशियमने परिपूर्ण असलेले एक पौष्टिक कंदमूळ आहे, जे डोळे, त्वचा आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी उत्तम आहे, तसेच ते कच्च्या, उकडलेल्या किंवा हलवा व कोशिंबिरीसारख्या पदार्थांमध्ये वापरले जाते, मात्र मधुमेहाच्या रुग्णांनी रस पिण्याऐवजी संपूर्ण खाणे अधिक गाजर फायदेशीर ठरते.
गाजराचे असेही फायदे..
• डोळ्यांचे आरोग्य : बीटा-कॅरोटीन व्हिटॅमिन ए मध्ये रुपांतरित होते, जे रात्रदृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आरोग्य राखते.
• रोगप्रतिकारशक्ती : व्हिटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
• त्वचा आणि केस : त्वचेच्या दुरुस्तीसाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी मदत करते.
• रक्तातील साखर : फायबरमुळे रक्तातील साखर हळू शोषली जाते, म्हणून मधुमेहाच्या रुग्णांसाठी संपूर्ण गाजर सुरक्षित आहे.
• पचनसंस्था : फायबरमुळे माणसाच्च्या शरीरातील पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.
